भ्रष्टाचाराविरोधातील लढाईसाठी ज्या केजरीवाल यांनी राजकारणात प्रवेश केला, तेच केजरीवाल भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटकेत आहेत. प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात क्रांतीचा नारा देणारे केजरीवाल अन्य राजकारण्यांसारखेच भ्रष्टाचारी निघाले हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव आहे.
भ्रष्टाचाराच्या विरोधात जनआंदोलन हाती घेत ज्या अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली, त्याच केजरीवाल यांची भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात रवानगी व्हावी, हा नियतीचा काव्यगत न्याय आहे, असेच म्हणावे लागेल. 'सब मिले हुए है' आणि 'सब चोर है' अशा घोषणा लोकप्रिय करत केजरीवाल यांनी स्वतःची प्रतिमा प्रस्थापित केली. भ्रष्ट राजकारण्यांविरोधात आवाज उठवणारा हा साधासुधा माणूस सामान्यांना आपल्यातला वाटला. राजधानी दिल्लीत सत्ताधारी काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचे त्यांनी काढलेले वाभाडे ही सर्वसामान्यांसाठी खूप मोठी गोष्ट. त्यांच्या मनातला 'नायक' त्यांच्या समोर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी सांगत होता, त्याविरोधात आवाज उठवत होता. म्हणूनच केजरीवाल यांना व्यापक जनाधार मिळाला.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलन पुकारले. उपोषण सुरू केले. हे आंदोलन काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात होते. केजरीवाल यांनी ही संधी साधत, त्याच व्यासपीठावरून आपला आवाज बुलंद केला. देशभरातील जनतेला तो भावला, विशेषत्वाने दिल्लीकरांना. राष्ट्रकुल स्पर्धेत झालेल्या गैरव्यवहारांचे तपशील दिल्लीकरांना सविस्तर माहिती होते. मात्र, त्याविरोधात आवाज उठवण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते. ते केजरीवाल यांनी दाखवले. म्हणूनच या आंदोलनाला दिल्लीकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. दिल्लीकरांना त्यांचा आदर्श असा नेता मिळाला.
प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात क्रांतीचा नारा देणारे केजरीवाल आज अन्य राजकारण्यांसारखेच भ्रष्टाचारी निघाले. त्यांच्याच भाषेत 'सब मिले हुए है' आणि 'सब चोर है'. त्यांचे निकटवर्तीय सहकारी यापूर्वीच तिहारच्या कारागृहात गजाआड झाले आहेत. केजरीवाल यांची रवानगी काही दिवसांतच तिहारमध्ये झाली, तर त्यात काहीही आश्चर्य नाही.
भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत स्वतःची प्रतिमा धर्मवीर अशी त्यांनी प्रस्थापित केली. राजकारणात आपण उतरणार नाही, असे म्हणत त्यांनी केव्हा स्वतःचा पक्ष स्थापन केला, निवडणुका लढवल्या हे कोणालाच कळले नाही. निवडून आल्यानंतर सरकारी निवासस्थान घेणार नाही, गाड्या घेणार नाही, असे म्हणणारे केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्यांनी आलिशान गाड्यांची मागणी केली. स्वतःसाठी कोट्यवधी रुपयांची निवासस्थाने हक्काने मागून घेतली. त्याच्या नूतनीकरणासाठी करोडो रुपयांचा चुराडा केला, तो वेगळाच. आता तर केजरीवाल यांनी सुमारे पन्नास कोटी रुपयांचा अनधिकृत बंगला उभारला आहे. माध्यमातील वृत्तानुसार एकेका गोष्टीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 2011-12 मध्ये त्यांचा राजकीय क्षितिजावर उदय झाला. एक तपानंतर 2024 मध्ये राजकीय अंताकडे त्यांची वाटचालही सुरू झाली. सामान्यांचा विश्वासघात करणारी अशीच ही कृती.
केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने एक नाही, दोन नाही, तर तब्बल दहा समन्स बजावले. त्यांची संभावना बेकायदेशीर अशी केजरीवाल यांनी केली. त्याचवेळी, न्यायालयात जाऊन संरक्षण घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. न्यायालयामार्फतही समन्स बजावण्यात आले. तेही त्यांनी मानले नाही. अखेर न्यायसंस्थांनी कायदेशीर संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर त्यांची रवानगी ईडीच्या कोठडीत झाली. दिल्ली उच्च न्यायालयानेही यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. दोन तारखेला ईडी आपले म्हणणे न्यायालयात सादर करणार आहे. हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात 1968 मध्ये जन्मलेल्या केजरीवाल यांनी आयआयटी खरगपूर येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध्ये ते कामालाही होते. मात्र, त्यांना खुणावत होते ते भारतीय महसूल सेवा क्षेत्र. त्यानुसार ते परीक्षा देत यात सहभागी झाले. आयकर विभागात ते कार्यरत होते. याच दरम्यान त्यांना 2006 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांची पत्नीही आयकर विभागातच होती.
नोव्हेंबर 2010 मध्ये इंडिया अगेन्स्ट करप्शन याची जी पहिली बैठक दिल्लीत झाली, त्यात ते सहभागी झाले होते. अण्णा हजारे आणि केजरीवाल यांचा परिचय याच मोहिमेतून झाला. लोकपालाची नियुक्ती करण्याची मागणी या माध्यमातून करण्यात आली. काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारने तयार केलेला लोकपाल विधेयकाचा मसुदा केजरीवाल आणि कंपनीला मान्य झाला नाही. म्हणूनच केंद्र सरकारविरोधात जनआंदोलन हाती घेण्यात आले. हजारे यांचे उपोषण आणि त्या व्यासपीठावर केजरीवाल यांचा म्हणूनच वाढता वावर राहिला. 2011 आणि 2012 या काळात आंदोलन केले गेले. 26 नोव्हेंबर 2012 रोजी आम आदमी पार्टीची स्थापनाही झाली. यावेळी हजारे यांना सोबत घेण्यात आले नाही, हे महत्त्वाचे. म्हणजे ज्यांचे बोट धरून केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्याविरोधातील लढाईत प्रवेश केला, त्याच हजारे यांना त्यांनी खड्यासारखे बाजूला सारले.
दिल्लीकरांना मोफत वीज देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दिल्लीकरांनीही मोफत या शब्दाला भुलून केजरीवाल यांना निवडून दिले. विधानसभा निवडणुकीत त्यांना भरघोस यश मिळाले. मात्र, केजरीवाल यांना संपूर्ण दिल्लीवर आपले नियंत्रण हवे होते. दिल्लीतील कायदा-सुव्यवस्था केंद्र सरकारच्या हातात होती. म्हणूनच त्यांनी त्यासाठी आणखी एक आंदोलन पुकारले. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीतील रस्त्यांवर ठिय्या मांडला. विद्यमान मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावर उतरले होते. प्रजासत्ताक दिन जवळ आलेला होता. अशावेळी केजरीवाल यांचे हे आंदोलन देशाच्या सुरक्षेला धोका उत्पन्न करणारे ठरू शकते, म्हणून अखेर लष्कराने कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर केजरीवाल यांनी ते मागे घेतले. राजधानी दिल्लीत सर्व पंतप्रधान, राष्ट्रपती, सर्व मंत्रालये, विविध देशांचे दूतावास असल्याने तेथील सुरक्षा ही केंद्र सरकारच्याच अखत्यारित असणे रास्त आहे. अन्यथा केजरीवाल यांनी केव्हाच त्यांना ताब्यात घेऊन देशाला वेठीला धरले असते.
आज भाजप, काँग्रेसनंतर एकापेक्षा जास्त राज्यांत सत्ता असणारा केजरीवाल यांची आम आदमी पार्टी ही एकमेव. पंजाबमध्ये 2022 मध्ये त्यांनी सत्ता स्थापन केली. दिल्लीबरोबरच गोवा, पंजाब आणि गुजरातमध्ये निवडणूक लढवत त्यांनी मतांची टक्केवारी गाठत राष्ट्रीय पक्ष म्हणून आम आदमी पार्टीला ओळख मिळवून दिली. सप्टेंबर 2023 मध्ये त्याला तो दर्जा मिळाला. अकरा वर्षांत केलेली ही प्रगती लक्षणीय अशीच ठरली. ज्या काँग्रेसविरोधात लढा देण्याच्या घोषणा देत केजरीवाल यांनी स्वतःची ओळख प्रस्थापित केली, त्या काँग्रेसप्रणीत 'इंडिया' आघाडीचे केजरीवाल घटक पक्ष आहेत. म्हणूनच काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करतात.
देशात सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला असताना अरविंद केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईमागे राजकीय हेतू असल्याची चर्चा आहे. जर्मनीपाठोपाठ अमेरिकेनेही केजरीवाल यांच्या अटकेची दखल घेतली आहे. केजरीवाल यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा अमेरिकेने व्यक्त केली आहे. विरोधकांना भाजप संपवत आहे, असा जो आरोप केला जातो, त्याला खतपाणी घालणारी ईडीची कारवाई ठरली असून निवडणुकीत त्याचा राजकीय लाभ आम आदमी पार्टीला होतो की भाजपला याचीच उत्सुकता आहे.
बिहारमधील चाराघोटाळाप्रकरणी लालूप्रसाद यादव यांच्यावर कारागृहात जाण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी पत्नी राबडीदेवी यांना मुख्यमंत्री केले होते. केजरीवाल त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा राजकीय लाभ घेत आहेत, हे निःसंशय. केजरीवाल यांनी आपल्या अन्य कोणत्याही सहकार्याला मोठे होऊ दिले नाही. त्याचे एक तर खच्चीकरण केले किंवा त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. याचमुळे आज दुसर्या फळीत त्यांच्या इतका ताकदवान नेता पक्षाकडे नाही. त्यांचे निकटवर्तीय मनीष सिसोदिया यापूर्वीच कारागृहात गेले आहेत. म्हणून त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाचे काम करणारा सक्षम नेता आम आदमी पार्टीकडे नाही. भ्रष्टाचाराविरोधातील लढाई लढण्यासाठी ज्या केजरीवाल यांनी राजकारणात प्रवेश केला, तेच केजरीवाल शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटकेत आहेत. म्हणजेच केजरीवाल यांचा लढा बेगडी होता, हे त्यांनीच आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
राजकारणी, उद्योग, माध्यमे, न्याययंत्रणा यातील प्रत्येकजण चोर आहे, असा आरोप करणारे केजरीवाल स्वतःही भ्रष्ट निघाले. सब मिले हुए है, असे म्हणत त्यांनी केव्हा काँग्रेसशी मैत्र केले, हेही समजले नाही. काँग्रेसच्या एकाही मंत्र्यावर केजरीवाल यांच्या आंदोलनामुळे कारवाई झाली नाही. त्याउलट केजरीवाल यांनाच त्यातून राजकीय बळ मिळाले. केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर अण्णा हजारे म्हणाले की, 'त्याने' चुकीचे काम केले असेल, तर त्याला शासन हे व्हायलाच हवे. मद्य धोरणावरून आपण त्याला पत्र लिहिले होते. त्याने त्याचे उत्तरही दिले नाही. भ्रष्टाचाराविरोधातील आवाज ते भ्रष्टाचार्यांचा आवाज असा केजरीवाल यांचा झालेला प्रवास हा नक्कीच शोचनीय असाच आहे.