जम्मू, पुढारी वृत्तसंस्था : Anantnag Encounter : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या चकमकीत एक कर्नल आणि एक मेजर या लष्करी अधिका-यांसह जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी शहीद झाले आहेत. लष्करी अधिकारी हे राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते.
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू-काश्मीरचे पोलीसचे डीएसपी हुमायून भट गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. पण उपचारादरम्यान तीनही अधिका-यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती लष्कर अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली सांगितले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, गडोले भागात दहशतवाद्यांविरोधातील कारवाई मंगळवारी संध्याकाळी सुरू झाली होती, मात्र ती रात्री थांबवण्यात आली. दहशतवादी या ठिकाणीच लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरू करण्यात आली. दरम्यान, दहशतवाद्यांवर हल्ला करणाऱ्या त्यांच्या पथकाचे नेतृत्व लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंग करत होते. मात्र, दहशतवाद्यांच्या गोळीबारात ते जखमी झाले.
या कारवाईदरम्यान लष्कराच्या एका श्वानाचाही मृत्यू झाला आहे. चकमकीत शहीद झालेल्या लष्कराच्या श्वानाचे नाव 'केंट' असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले. चकमकीदरम्यान त्याने आपल्या हँडलरला वाचवले आणि तो शहीद झाला. केंट हा दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व करत होते. यादरम्यान गोळी लागली.
दरम्यान, मंगळवारी दुपारपासून राजौरीतील नारला भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत, तर एक जवान आणि एक स्निफर डॉग शहीद झाला. याशिवाय तीन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. 45 दिवसांत राजौरी आणि पुंछ भागात भारतीय लष्कराने आतापर्यंत 20 दहशतवाद्यांना ठार केले आहे. बहुतांश दहशतवादी पाकिस्तानी होते. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राजौरी आणि पूंछ या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये यावर्षी झालेल्या चकमकीत सुमारे 26 दहशतवादी मारले गेले आणि 10 सुरक्षा जवान शहीद झाले. सीमेपलीकडून घुसखोरी करणाच्या प्रयत्नात बहुतांश दहशतवादी मारले गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रियासी जिल्ह्यातील चासना भागाजवळील गली सोहब गावात 4 सप्टेंबर रोजी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. या चकमकीदरम्यान, दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते.