Latest

करवीर छत्रपतींचा श्रीराम रथोत्सव

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांचे नवरात्र सुरू होते. या नवरात्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे करवीर छत्रपतींनी सुरू केलेला श्रीरामांचा रथोत्सव. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील रामाचा पार येथील राम मंदिरातून रामनवमीदिवशी रात्री 9 वाजता रथ निघतो.

छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टने श्रीराम रथोत्सवाची शतकोत्तर परंपरा आजही कायम ठेवली आहे. इतकेच नव्हे तर नवरात्राच्या दुसर्‍या दिवशीपासून दररोज अष्टमीपर्यंत सायंकाळी रामनामाच्या गजरात श्रीरामांची पालखी मंदिरातून बाहेर पडते.

सागवानी लाकडापासून तयार केलेल्या या मजबूत व आकर्षक दुमजली रथात धनुर्धारी प्रभू रामचंद्र व लक्ष्मण, सीतामाता व हनुमंत यांच्या पितळी धातूच्या मूर्ती लक्षवेधी असतात. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रामरथाची निर्मिती केली. या संदर्भातील नोंदी करवीर छत्रपतींच्या हुजूर ऑफिसातील कागदपत्रात मिळतात.

छत्रपती देवस्थानतर्फे 12 जून 1908 च्या नोंदीत करवीर निवासिनी अंबाबाईच्या रथाप्रमाणे श्री रामचंद्र देवाचा रथ तयार करण्याचे आदेश राजर्षींनी दिले होते. यासाठी 600 रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली होती. या आदेशावर मोडी लिपीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची स्वाक्षरीही आहे.

राम रथोत्सव सोहळ्यात स्वतः छत्रपती व दरबारी मानकरी यांच्यासह उंट, हत्ती, घोडे असा लवाजमा असायचा. रथ पूर्व दरवाजातून नगर प्रदक्षिणेस बाहेर पडून भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड, गुजरी मार्गे परत मंदिरात येतो. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

श्रीराम मंदिराची पूजा अर्चा व्यवस्था झुरळे घराण्याकडे असून श्रीराम मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी हरीभट झुरळे यांच्यापासून सुरू झालेली असून सध्या सुहास झुरळे, सुरेंद्र झुरळे कुटुंबीय सेवा कार्यात सक्रिय आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT