लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काँग्रेस आणि भाजपने विजयक्षमता या एकाच निकषावर उमेदवार जाहीर केले आहेत. त्याआधी चर्चेच्या अनेक फेर्या झडल्या. विजय-पराजयाची गणिते मांडण्यात आली. बी फॉर्म मिळालेले उमेदवार अर्ज भरण्यासाठी सज्जही झाले आहेत. परंतु, अनेकांना पराभवाची चिंता भेडसावत आहे. निवडणुकीदरम्यान आपल्या विरोधात आपल्याच पक्षातील नेते सक्रिय होण्याची भीती अनेकांना सतावत आहे. उल्लेखनीय म्हणजे याला कोणताच पक्ष अपवाद नाही; ना काँग्रेस, ना भाजप, ना देवेगौडा यांचा निजद.
कर्नाटकात प्रचाराची तीव्रता वाढत असताना उमेदवारांना स्वपक्षातील नाराजांची मोट बांधण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. नाराजांना हाताळण्यात यशस्वी ठरणार्या उमेदवारांच्याच पदरात यश पडेल, इतके मतभेद तीव्र दिसत आहेत. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील चिक्कबळ्ळापूर, तुमकूर, बंगळूर उत्तर, उडुपी-चिक्कमगळूर, चित्रदुर्ग, दावणगेरे, कोप्पळ आणि बळ्ळारी लोकसभा मतदार संघातील भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना स्वकीयांकडूनच घात होण्याची चिंता सतावत आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही पक्षांमध्ये उडालेला नाराजीचा भडका काही प्रमाणात थंड झाला असल्याचे सकृतदर्शनी दिसते. परंतु, ही शांंतता म्हणजे बंडखोरीच्या विस्तवावर साचलेली राख आहे. कोणत्याही क्षणी उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात सर्वाधिक जागा मिळविण्याचा निर्धार भाजपने केला आहे. परंतु, त्यांनाही नाराजीचा सामना करावा लागत आहे. हायकमांडच्या सूचनेनुसार माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी काही प्रमाणात बंडखोरी मोडून काढण्यात यश मिळविले आहे. परंतु, शिमोगामध्ये असंतोष धुमसत आहे. माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी बंडाचा झेंडा खाली घेण्यास नकार दिला आहे. तुमकूर, दावणगेरे, बेळगाव आणि कोप्पळ लोकसभा मतदार संघातील बंडखोरी थंडावल्याचे दिसून येत असले तरी नाराजीचा कधीही भडका उडण्याची शक्यता आहे.
तुमकूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार व्ही. सोमण्णा यांच्या विरोधात माजी मंत्री मधुस्वामी यांनी बंडखोरी केली होती. येडियुराप्पा यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्यामुळे वादावर पडदा पडला आहे. परंतु, सोमण्णा यांचा प्रचार करण्याबाबत मधुस्वामी यांनी अद्याप संमती दर्शविलेली नाही. त्यांचे कार्यकर्तेही सोमण्णा यांच्या प्रचारापासून अलिप्त आहेत.
दावणगेरे लोकसभा मतदार संघातील बंडखोरी मिटवण्यात यश आले नाही. जी. एम. सिद्धेश्वर यांच्या पत्नी उमेदवार असून, त्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची धमकी माजी मंत्री एस. रवींद्रनाथ यांनी दिली होती. ती भूमिका आता त्यांनी मागे घेतली आहे. येडियुराप्पा यांना प्रतिसाद देत त्यांनी उमेदवाराकडे पाहून नाही, तर मोदी आणि भाजपकडे पाहून मतदान करणार असल्याचे जाहीर केले आहे. कोप्पळमध्ये खासदार करडी संगण्णाा यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळे ते नाराज आहेत. त्यांनी निवडणुकीपासून तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.
रायचूरमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक असणारे माजी खासदार बी. व्ही. नाईक नाराज आहेत. त्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय स्थगित केला असून, ते निवडणुकीत तटस्थ राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना त्यांनी मतस्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
बेळगाव लोकसभा मतदार संघातून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. येडियुराप्पा यांनी नाराजांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत त्यांची समजूत काढली आहे. परंतु, त्यांच्या बैठकीपासून रमेश जारकीहोळी व भालचंद्र जारकीहोळी लांब होते. याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर डॉ. प्रभाकर कोरे यांचीही नाराजी कायम असल्याचे सांगण्यात येते. शिमोगामध्ये माजी मंत्री ईश्वरप्पा यांनी भाजप व येडियुराप्पा यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. त्यांना विश्वासात न घेता उमेदवार जाहीर करण्यात आल्याने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. चित्रदुर्ग मतदार संघात माजी मंत्री गोविंद कारजोळ यांना विरोध होत आहे. त्यांच्या विरोधात आमदार चंद्रप्पा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे बंडखोर आणि उमेदवार हे दोघेही येडियुराप्पा यांच्या गोटातील म्हणून ओळखले जातात. चंद्रप्पा यांनी आपला मुलगा रघुचंदन यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरला आहे. तर कारजोळ यांच्या गोटातून चंद्रप्पा यांना पक्षातून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
कारवार मतदार संघातील उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी हे स्वतः बंड मोडून काढण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. संघ परिवारातील नेत्यांसोबत चर्चा करून माजी खासदार अनंतकुमार हेगडे आणि त्यांच्या साथीदारांचे मन वळवण्याचे प्रयत्न करत आहेत. तर अनंतकुमार हेगडे यांनी विश्वेश्वर हेगडे यांच्याबरोबर चर्चा करण्यास नकार दिल्याने अडचण निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राज्यात काँग्रेसचे किमान 20 खासदार निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. यामुळे उमेदवारी निवडीवरून निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी दोघांनीही कंबर कसली आहे. अनेकांची समजून घालण्यात यश मिळविले असले तरी मते मिळतील का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
बागलकोट लोकसभा मतदार संघातून दुसर्यांदा लोकसभेची निवडणूक लढविण्यास वीणा काशपण्णावार सज्ज होत्या. परंतु, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्या नाराज आहेत. वीणा काशपण्णावार यांना महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद देण्याचे आश्वासन नेत्यांनी दिले. परंतु त्याकडे दुर्लक्ष त्यांनी करत पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या उमेदवार संयुक्ता पाटील यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बिदर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी राजशेखर पाटील-हुमनाबाद इच्छुक होते. परंतु, उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे. अखेरच्या क्षणी ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता असून, त्याचा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसण्याची आहे. चिक्कबळ्ळापूर उमेदवार निवडीवरून मतदार संघातील अनेक आमदार नाराज आहेत. गौरी बिदनूर मतदार संघाचे माजी आमदार शिवशंकर रेड्डी यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. कोलार मतदार संघातील उमेदवार निवडीतील राजकारणामुळे दुफळी पडली आहे. माजी मंत्री रमेशकुमार यांच्या गटाने उमेदवारांच्या निवडीचे स्वागत केले आहे. परंतु, अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दोन्ही राष्ट्रीय पक्षांना नाराजांचा सामना करावा लागत असताना निजदलाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तुमकूर, चिक्कबळ्ळापूर, विजापूर, रायचूर, चित्रदुर्ग, म्हैसूर, चामराजनगर लोकसभा मतदार संघात निजदची स्थिती मजबूत आहे. पण भाजपबरोबर युती असल्याने केवळ तीन जागांवर निजदला समाधान मानावे लागत आहे.
निजद नेते, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी भाजपच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेण्यात यश मिळवले आहे. कुमारस्वामी यांचे अनेक मतदार संघात कार्यकर्ते आहेत. त्यामुळे भाजपचे बहुतांश उमेदवार त्यांना भेटून त्यांच्या वतीने प्रचार करण्याची विनंती करत आहेत. विशेषत: चिक्कबळ्ळापूर, बंगळूर उत्तर, चामराजनगर, उडुपी-चिक्कमंगळूर, बंगळूर दक्षिण आणि चित्रदुर्ग येथील भाजप उमेदवार कुमारस्वामी यांना स्टार प्रचारक मानतात. मात्र, त्याचवेळी भाजप नेते निजदच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. प्रचारापासून दूर ठेवण्यात येत आहे, असा आरोप निजदच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. वरिष्ठ पातळीवर युती झाली तरी स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची मने जुळलेली नाहीत. त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो. थोडक्यात तिन्ही पक्षांत नाराजी आहे. ती मिटविण्यात ज्याला यश मिळेल, त्यालाच एकूण 28 पैकी अधिक जागाही मिळतील.