Latest

Karnataka bans gobi manchurian | कर्नाटकात गोबी मंच्युरिअन, कॉटन कँडीवर बंदी, काय कारण?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : कर्नाटक सरकारने आरोग्याच्या कारणास्तव कुत्रिम रंगाचा वापर असलेली गोबी मंच्युरिअन, कॉटन कँडीवर बंदी घातली आहे. या खाद्यपदार्थांमध्ये कार्सिनोजेनिक रसायनांचा वापर केला जात असल्याचे आढळल्यानंतर कर्नाटक सरकारने सोमवारी रंगीत कॉटन कँडी आणि कृत्रिम रंगाचा वापर करुन गोबी मंच्युरिअन तयार करणे आणि अशा पदार्थांच्या विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पण, राज्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी या पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदीची शक्यता नाकारली आहे.

तामिळनाडू आणि गोवा सरकारने अनुक्रमे कॉटन कँडी आणि गोबी मंच्युरिअनच्या विक्रीवर बंदी घातली आहे. दरम्यान, कर्नाटक आरोग्य विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी बंगळूर आणि राज्याच्या इतर भागांतून २०० हून अधिक नमुने घेतले होते. याबाबत माहिती देताना आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव राव म्हणाले, "१७१ गोबी मंच्युरिअनच्या नमुन्यांपैकी तब्बल १०७ नमुने टार्ट्राझिन, सनसेट यलो आणि कार्मोसिन कलर सारख्या कार्सिनोजेनिक रसायनांसाठी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे कॉटन कँडीच्या २५ नमुन्यांपैकी सुमारे १५ नमुन्यांत टार्ट्राझिन आणि रोडामाइन-बी सारख्या कृत्रिम आणि कर्करोगास कारणीभूत रसायनांचा वापर झाल्याचे आढळून आले आहे.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की चाचणी अभ्यास आणि कृत्रिम रंगांच्या वापराच्या पुष्टीकरणाच्या आधारावर, सरकारने कारवाईचे आदेश दिले आहेत. "खाद्यपदार्थ विक्रेते, भोजनालये आणि हॉटेल/रेस्टॉरंट्सने या आदेशाचे कसल्याही प्रकारे उल्लंघन केल्यास व्यापार परवाना रद्द करण्याबरोबरच ७ वर्ष ते आजीवन कारावास आणि १० लाख रुपयांच्या दंडासह शिक्षेची तरतूद केली जाईल."

मात्र, या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याची शक्यता आरोग्यमंत्र्यांनी फेटाळून लावली. "गोबी ही पौष्टिक भाजी असून लोकांनी ती खावी. जे कृत्रिम रंग आणि रसायनांचा वापर करत आहेत; त्यांच्याविरुद्ध आम्ही कारवाई करत आहोत. पण विना-रंगीत कँडी (पांढरी) च्या विक्रीला परवानगी राहील."

तामिळनाडू सरकारने याआधीच 'कॉटन कँडी'च्या विक्रीवर बंदी घातली आहे. कारण त्यात कर्करोगास कारणीभूत असलेले केमिकल्स आढळून आल्याची पुष्टी चाचणी अहवालांतून झाली आहे. त्याआधी पुद्दुचेरीत 'कॉटन कँडी'वर बंदी घातली होती. आता कर्नाटक सरकारने 'कॉटन कँडी'च्या विक्रीवर बंदी घातली आहे.

शरिरावर होतात घातक परिणाम

रोडामाइन-बी हा एक रंग आहे ज्याचा वापर औद्योगिक कारणांसाठी केला जातो. याचा वापर लेदर कलरिंग तसेच पेपर प्रिंटिंगमध्ये केला जातो. त्याचा वापर फूड कलरिंगसाठी करता येत नाही आणि याचा वापर खाद्यपदार्थात केल्यास आरोग्यासाठी ते घातक ठरू शकते. याच्या सेवनाने श्वासोच्छवासाचा त्रासही होऊ शकतो.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT