Latest

DK Shivakumar : डीके शिवकुमार नाराज? अचानक दिल्लीला जाणे टाळले, म्हणाले…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : मला पोटात संसर्ग झाला आहे आणि आज मी दिल्लीला जाणार नाही. निवडून आलेले 135 आमदार हे काँग्रेसचे आहेत. माझ्याकडे एकही आमदार नाही. मुख्यमंत्री कुणाला करायचे हा निर्णय मी पक्षप्रमुखांवर सोडला आहे, असे स्पष्टीकरण कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनी दिले.

कर्नाटक मुख्‍यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्‍ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. माजी मुख्‍यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशामध्‍यक्ष डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्‍सीखेच सुरु आहे. दरम्‍यान, आज दुपारी सिद्धरामय्या पक्षश्रेष्‍ठींची भेट घेण्‍यासाठी दिल्लीला रवाना झाले. शिवकुमार हे सायंकाळी पाचनंतर दिल्लीला जाणार होते. पण प्रकृतीचे कारण देत त्यांनी अचानक आपण दिल्लीला जात नसल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाने कर्नाटकातील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

तत्पूर्वी सिद्धारमय्या यांनी आमदारांचे बहुमत आपल्याकडे आहे असा दावा केला होता. त्यामुळे शिवकुमार यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. सोमवारी दुपारी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, धाडस असलेला व्यक्ती एकटा बहुमत निर्माण करु शकतो. मी एकटा म्हणजे बहुमत आहे. माझ्या नेतृत्वात आज कर्नाटकात 135 आमदार निवडून आले आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना कर्नाटक जिंकून देण्याचे मी वचन दिले होते, ते मी पूर्ण केले आहे,' असे शिवकुमार (DK Shivakumar) यांनी सांगितले.

सिद्धरामय्या दिल्लीत पोहचले आहेत. ते पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, पक्षाच्या आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी काँग्रेसने नियुक्त केलेल्या केंद्रीय निरीक्षकांनी त्यांचा अहवाल सादर केला आहे. त्या आधारे खर्गे आज रात्री उशीरा मुख्यमंत्री पदासाठी नावाची घोषणा करतील अशी शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT