निपाणी; पुढारी वृत्तसेवा : निपाणी विधानसभा मतदारसंघातून मतदारराजाने उच्चांकी 83 टक्के मतदान केले. यात कोण बाजी मारणार? मंत्री शशिकला जोल्ले विजयी होऊन हॅट्ट्रिक करणार की गत दोन निवडणुकीतील पराभवाचा वचपा काकासाहेब पाटील काढणार, का राष्ट्रवादी काँग्रेसचे नवखे उमेदवार उत्तम पाटील यांना यश मिळणार, याचा फैसला शनिवारी होणार आहे. हा निकाल निपाणीच्या राजकारणाला दिशा देईल, असे मत व्यक्त होत आहे.
निपाणी विधानसभा मतदारसंघावर महाराष्ट्र एकीकरण समितीनंतर काँग्रेसनेच आपले वर्चस्व अधिकतर वेळा ठेवले आहे. दरम्यान, निजदनेही प्रा. सुभाष जोशी यांच्या माध्यमातून दोनवेळा निपाणीवर वर्चस्व ठेवले. पण 1999, 2004 व 2008 मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रा. जोशीना पराभूत करत काकासाहेब पाटील यांनी विजयाची हट्ॅट्रिक साधली होती. आता सलग तीन विजय मिळवून भाजपच्या शशिकला जोल्ले हॅट्ट्रिक साधणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांनी जनशक्तीविरुद्ध धनशक्ती असा प्रचार करून आपली ही शेवटची निवडणूक असल्याची साद घातली होती. निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार करताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. वाढलेली चुरस उच्चांकी मतदान होण्यास कारण ठरली. यामुळे या निवडणुकीत मतदाराचा कोणाला मतरुपी आशीर्वाद मिळणार हे कोणीच सांगू शकत नाही.
भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे निवडणुकीतील जय व पराजय निपाणीच्या राजकारणाला नवी दिशा देणार आहे. कोण जल्लोष करण्याचा मान पटकावणार व विजयी गुलाल कोणाच्या माथी लागणार, हे निकालातून स्पष्ट होणार आहे.