Latest

Kane Williamson : विल्यमसनचा पाकिस्तानात विक्रमांचा पाऊस! सचिन-विराटला टाकले मागे

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kane Williamson Double Century : न्यूझीलंडचा माजी कर्णधार फलंदाज केन विल्यमसनने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत द्विशतक झळकावले. यासह त्याने न्यूझीलंडसाठी एक मोठा विक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके झळकावणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने ब्रेंडन मॅक्क्युलमला मागे टाकले आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात विल्यनसने 200 धावांचा आकडा गाठताच कर्णधार टिम साऊदीने 9 बाद 612 धावांवर डाव घोषित केला.

कराची येथे खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विल्यमसनने (Kane Williamson) 395 चेंडूत 21 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 200 धावांचा आकडा पार केला. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 50.63 राहिला. विल्यमसनचे हे कसोटीतील पाचवे द्विशतक असून त्याने न्यूझीलंडकडून चार कसोटी द्विशतके झळकावणाऱ्या ब्रेंडन मॅक्युलमला मागे टाकले आहे. तर याबाबतीत त्याने ग्रॅम स्मिथ, जो रूट, राहुल द्रविड आणि अॅलिस्टर कुक या दिग्गजांची बरोबरी केली आहे. द्विशतक झळकावणा-या सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये यादीत विल्यमसन हा आता भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (7 द्विशतके) मागे आहे. तर तो पहिला गैर आशियाई क्रिकेटर आहे ज्याला 10 विविध देशांच्या मैदानावर शतकी खेळी साकारण्यात यश आले आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत विल्यमसनने भारत, श्रीलंका, बांगलादेश, यूएई, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या देशांव्यतिरिक्त मायदेश न्यूझीलंडमध्ये कसोटी शतके झळकावली आहेत. (Kane Williamson Double Century in karachi test against pakistan)

विल्यमसन 10 देशांमध्ये शतक ठोकणारा सहावा फलंदाज

सर्वाधिक देशांमध्ये कसोटी शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खान अव्वल स्थानी आहे. त्याने 11 देशांमध्ये हा पराक्रम केला. त्याच्या खालोखाल राहुल द्रविड, महेला जयवर्धने, कुमार संगकारा, मोहम्मद युसूफ, सईद अन्वर आणि आता विल्यमसन यांचा क्रमांक लागतो. म्हणजेच विल्यमसन जगातील 10 देशांमध्ये शतक ठोकणारा सहावा फलंदाज ठरला आहे. त्याला अकून द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात अद्याप शतक फटकावता आलेले नाही.

विल्यमसन हा 25 शतके झळकावणारा पहिला किवी क्रिकेटर (Kane Williamson)

केन विल्यमसनने 89 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 54.06 च्या प्रभावी सरासरीने 7,568 धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. यामध्ये 33 अर्धशतके आणि 25 शतकांचा समावेश आहे. कसोटीतील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 251 धावा आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 839 चौकार आणि 18 षटकारही मारले आहेत. कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर विल्यमसने कराची कसोटीच्या तिस-या दिवशी पहिले आणि कारकिर्दीतील 25 वे शतक ठोकले. यापूर्वी, त्याने जानेवारी 2021 मध्ये पाकिस्तानविरुद्धच शतक झळकावले होते. त्या डावात त्याने 238 धावा केल्या होत्या. (Kane Williamson Double Century in karachi test against pakistan)

722 दिवसांनी गाठला शतकी आकडा

विल्यमसनने (Kane Williamson) जवळपास दोन वर्षांनी (722 दिवसांनी) शतकी आकडा गाठला. त्याचबरोबर त्याने कसोटी शतकांच्या बाबतीत ग्रेग चॅपेल, मोहम्मद युसूफ आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांना मागे टाकले. तसेच सर्वाधिक कसोटी शतकांच्या बाबतीत त्याने पाकिस्तानच्या इंझमाम-उल-हक आणि ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरची बरोबरी केली.

विल्यमसनच्या पाकविरुद्ध 1000 हून अधिक कसोटी धावा

विल्यमसनच्या बॅटने पाकिस्तानविरुद्ध धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने पाकविरुद्ध पाचवे शतक पूर्ण करता करता सलग दुस-यांदा द्विशतक फटकावले. पाकविरुद्धच्या शेवटच्या 11 डावांत विल्यमसनने 200*, 238, 21, 129, 139, 89, 30, 28*, 37 आणि 63 अशा खेळी केल्या असून तो एकमेव किवी खेळाडू आहे ज्याने पाकिस्तानविरुद्ध 1000 हून अधिक कसोटी धावा वसूल केल्या आहेत.

कराची कसोटीत किवींचे पारडे जड…

तत्पूर्वी, यजमान पाकिस्तानचा पहिला दाव 438 धावांत ऑलआउट झाला. त्यानंतर किवींनी आपल्या पहिल्या डावात पाकच्या गोलंदाजांना अक्षरश: रडवले. कॉन्वे (92), लॅथम (113), विल्यमसन (नाबाद 200), ॲरेल मिचेल (42), टॉम ब्लंडेल (47) आणि इश सोढी (65) यांनी केलेल्या दमदार फलंदाजांच्या जोरावर न्यूझीलंडने 9 गडी गमावून 612 धावांचा डोंगर रचला आणि यजमानांविरुद्ध 174 धावांची भक्कम आघाडी घेतली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT