पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान (BAN vs SL) श्रीलंकेचा फलंदाज कामिंडू मेंडिस (कसोटी विक्रम) याने इतिहास रचला आहे. कमिंडू मेंडिस याने सातव्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावली आहेत. (Kamindu Mendis Record) अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कमिंडू मेंडिसने पहिल्या डावात १०२ धावांची खेळी केली, तर दुसऱ्या डावातही त्याने दमदार शतक झळकवले. पहिल्या डावातही कामिंडू सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने १०२ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात कामिंडूने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावले.
कामिंदू मेंडिस त्याचा फक्त दुसरा कसोटी सामना खेळत आहे. अत्यंत कमी कालावधीत मेंडिसने आपल्या फलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. आतापर्यंत आपल्या तीन डावांमध्ये कामिंदू मेंडिसने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.
या कसोटी सामन्यात धनंजय डी सिल्वा आणि कामिंडू मेंडिस यांनी दोन्ही डावात शतके झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. एकाच फलंदाजाने एकाच कसोटीतील दोन्ही डावांत शतके झळकावण्याचा पराक्रम करण्याची कसोटी क्रिकेटमधील ही केवळ तिसरी वेळ आहे. यापूर्वी 2014 मध्ये अझहर अली आणि मिसबाह-उल-हक यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावण्याचा पराक्रम केला होता. त्याच वेळी, प्रथमच असा पराक्रम 1974 साली झाला होता, जेव्हा इयान चॅपेल आणि ग्रेग चॅपेल यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीच्या दोन्ही डावांत शतके झळकावली होती.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंका संघाने पकड मिळवली आहे. श्रीलंकेने पहिल्या डावात 280 धावा केल्या होत्या, त्यानंतर बांगलादेशचा संघाचा पहिला डाव केवळ 188 धावावरच आटोपला. श्रीलंकेने बांगलादेशसमोर दुसर्या डावात श्रीलंकेने ५११ धावांचे अशक्य असे लक्ष्य ठेवले. याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या फलंदाजांनी नांगी टाकली. आजचा खेळाचा दिवस संपेपर्यंत 47 धावांमध्ये बांगलादेशने पाच गडी गामवले. पराभवाच्या उंबरठ्यावर असणार्या बांगलादेशसमोर अजूनही ४६४ धावांचे आव्हान आहे.