मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण लोकसभेच्या लढतीकडे राज्यच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विक्रमी मतांनी हॅट्ट्रिक साधण्याची रणनीती आखणार्या महायुतीचे उमेदवार डॉ. शिंदे यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीने महिला कार्ड खेळत शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. सलग दुसर्यांदा निवडणूक न लढविता मनसेने यावेळी महायुतीला पाठिंबा दिल्याने तिसर्यांदा कल्याणची सुभेदारी राखण्यासाठी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळेल.
कल्याण लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा ठोकत खासदार शिंदे यांच्याविरोधात जाहीर भूमिका घेतली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा करीत भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश देत कामाला लागण्याचे आदेश दिले. शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळ्या झाडणारे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीने महाविकास आघाडीच्या प्रचारात सामील होऊन शिवसेनेला (शिंदे) इशारा दिला होता. मात्र, शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली झाल्या आणि कल्याण पूर्वेच्या भाजपमधील असंतोष शमला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर न करता इतर उमेदवारांप्रमाणे अंतिम टप्प्यात जाहीर केली. या कृतीतून राज्यातील अन्य कार्यकर्त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी संदेश दिल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरू होता. खासदार शिंदे यांच्याविरोधात आगरी चेहरा अथवा उमेदवार आयात करण्यावर खलबते झाली. मात्र, मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आणि महाविकास आघाडीचा नियोजित डाव गडबडला. अखेर ठाकरे गटाने उमेदवार आयात करण्याचा विचार सोडून माजी नगरसेविका वैशाली दरेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरिवले आहे. दरेकर यांनी 2009 मध्ये मनसेकडून कल्याण लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यांना 1 लाख दोन हजार मते मिळाली होती. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे यांनी दोन लाख 12 हजार मते घेत कल्याणची सुभेदारी मिळविली होती.
त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांनी 1 लाख 88 हजार मते घेत झुंज दिली होती. 2014 च्या निवडणुकीत आनंद परांजपे यांनी शिवसेना सोडल्याने त्यांची लढत डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी झाली. डॉ. शिंदे यांनी तब्बल अडीच लाखांच्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार परांजपे यांचा दारुण पराभव केला. त्यावेळीही मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी 1 लाख 22 हजार मते घेतली होती.
पाच वर्षांत राजकीय समीकरणे बदलली आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी 2019 च्या निवडणुकीत तब्बल 3 लाख 44 हजार मतांच्या फरकाने एकतर्फी विजय मिळवत कल्याणची सुभेदारी दुसर्यांदा राखली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला 2 लाख 15 हजार मते पडली. त्यावेळी मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता, हे विशेष. आता पुन्हा राजकीय गणिते बदलली असून, शिवसेना फुटली आणि मनसेने महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार शिंदे यांनी कल्याणची सुभेदारी राखताना विक्रमी मते कशी मिळतील, यावर अधिक लक्ष केंद्रित केल्याची रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.