Latest

चक्क अंटार्क्टिकात घेतले कलिंगडचे उत्पादन!

Arun Patil

वॉशिंग्टन : पृथ्वीवरील सर्वात थंड प्रदेश म्हणजे अंटार्क्टिका. दक्षिण ध्रुवावरील या खंडावर कुणी कलिंगडचे उत्पादन घेईल, याची आपण कल्पनाही करणार नाही; मात्र संशोधकांनी अशा विपरीत जागेतही कलिंगडचे उत्पादन घेण्यात यश मिळवले आहे.

रशियाच्या 'व्होस्टोक स्टेशन' या संशोधन केंद्रात कलिंगडची रोपे उगवून त्यांना अशी फळे धरण्यात यश आले. या केंद्रातील हा एक महत्त्वाचा कृषी प्रयोग होता. 'पोल ऑफ कोल्ड' या नावाने ओळखल्या जाणार्‍या ठिकाणी हे रशियन संशोधन केंद्र आहे. याचे कारण म्हणजे ते पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण म्हणून ओळखले जाते. तिथे एकदा उणे 89.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. अशा अतिथंड ठिकाणीही कलिंगडचे उत्पादन घेण्यात यश आले.

कलिंगडचा इतिहास पाहता 4300 वर्षांपूर्वी सध्याच्या सुदानमध्ये त्याची उत्पत्ती झाली, असे मानले जाते. अंटार्क्टिकासारख्या थंड प्रदेशात हे फळ येणे हे कल्पनेच्या पलीकडचे आहे; मात्र रशियन अंटार्क्टिक एक्सपिडिशन ऑफ द आर्क्टिक अँड अंटार्क्टिक रिसर्च इन्स्टिट्यूट (एएआरआय) तसेच रशियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या अग्रोफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट व इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल प्रॉब्लेम्स येथील संशोधकांच्या प्रयत्नांना हे यश मिळाले.

व्होस्टोक स्टेशनच्या ग्रीनहाऊसमध्ये हवेचे तापमान तसेच आर्द्रतेचे प्रमाण वाढवून हा प्रयोग करण्यात आला. असे वातावरण या रसाळ फळाला अनुकूल असते. त्यांनी मातीच्या एका पातळ थरात कलिंगडचे बीज पेरले आणि या रोपांसाठी सूर्यप्रकाशाची नक्कल करणारी विशेष प्रकाशव्यवस्था निर्माण करण्यात आली. हातानेच या वनस्पतीचे परागीकरणही करण्यात आले. बी पेरल्यानंतर बरोबर 103 दिवसांनी सहा वेगवेगळ्या झाडांकडून आठ रसाळ फळे मिळाली. प्रत्येक कलिंगडचा व्यास पाच इंचांपर्यंत होता आणि त्यांचे वजन एक किलोपर्यंत होते.

SCROLL FOR NEXT