Latest

मराठमोळ्या प्रसन्ना वराळे यांनी घेतली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना बी वराळे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी त्यांना पदाची शपथ दिली. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे हे मूळचे महाराष्ट्रातील आहेत.

न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी सुरुवातीला ​​​औरंगाबाद खंडपीठात सहायक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून काम केल्यानंतर जुलै २००८ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायदान सेवेत आले. पुढे १४ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर न्या. प्रसन्ना वराळे यांची ऑक्टोबर २०२२ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती.
२३ जून १९६२ रोजी निपाणी येथे जन्मलेले प्रसन्ना वराळे यांना शिक्षणाचा व कायदा क्षेत्राचाही चांगला वारसा लाभला आहे. त्यांचे आजोबा बळवंतराव वराळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्तीय होते. न्या. प्रसन्ना वराळे यांनी आपले शालेय शिक्षण शहादा, शिरपूर, नाशिक इथून पूर्ण केल्यानंतर लातूरच्या दयानंद विधी महाविद्यालयातुन त्यांनी पदवी मिळवली. त्यानंतर १९८५ मध्ये त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकिली सुरू केली. काही काळ त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे.
SCROLL FOR NEXT