Latest

JP Nadda Criticise : विरोधकांची आघाडी आभासी असल्यामुळे त्यांची बैठक आभासी होणे स्वाभाविक; जे पी नड्डा यांची टीका

backup backup

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विरोधकांची इंडिया आघाडी परिवार वाचवा आणि संपत्ती वाचवा हे दोन अजेंडे ठेवून काम करत आहे. तसेच विरोधकांची आघाडीच आभासी असल्यामुळे बैठक आभासी होणे स्वाभाविक आहे, असे म्हणत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. विरोधकांच्या आघाडीत असलेल्या परिवारवादाची जंत्रीही त्यांनी यावेळी वाचून दाखवली.

शनिवारी (दि. १३) दिल्लीतील भाजप मुख्यालयात 'नमो नवमतदाता' मोहिमेची सुरुवात करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. दरम्यान, या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि युवा मोर्चाचे प्रभारी सुनील बंसल, युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या उपस्थित होते. दिल्लीतील युवक मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशभरात विविध ठिकाणी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून एक कोटींहून जास्त युवकांपर्यंत प्रत्यक्ष स्वरूपात पोहोचणे हा भाजपचा उद्देश असणार आहे. यावेळी 'नमो नवमतदाता' या अभियानाच्या लोगो आणि टी-शर्टचे अनावरण करण्यात आले.

यावेळी बोलताना जे पी नड्डा म्हणाले की, भारतातील ६१ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. ही लोकसंख्या म्हणजे आपली शक्ती, ऊर्जा आणि संपत्ती आहे. ही तरुणाई विकसित भारत बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. २५ जानेवारीला 'नव मतदार दिवस' साजरा केला जातो. या दिवशी देशभरात जवळपास ५ हजार ठिकाणी मोठ्या स्क्रीन्स लावण्यात येतील. आणि हजारो विद्यार्थी, युवक त्या ठिकाणी एकत्र येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व युवकांना मार्गदर्शन करतील, त्यांच्याशी संवाद साधतील. अशी माहितीही जे. पी. नड्डा यांनी यावेळी दिले. दरम्यान, २५ जानेवारीपर्यंत एक कोटी लोकांची नोंदणी 'नमो नवमतदाता' अभियानाअंतर्गत झाले पाहिजे असेही जे. पी. नड्डा म्हणाले.

काही वर्षांपूर्वी देशातील युवक मोठ्या संधीसाठी किंवा संशोधनासाठी विदेशात जात होते. मात्र आता त्यांना या संधी भारतात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. अलीकडच्या काळात भारतात पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा, दळवळणाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. पंततप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात कोट्यावधी महिलांच्या नशिबी सन्मानाने जगणे आले. देश मोदींच्या नेतृत्वात जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. लवकरच आपला देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. असेही नड्डा म्हणाले.

काँग्रेसवर आणि इंडिया आघाडीवर जोरदार टीका

इंडिया आघाडीची आभासी बैठक होत आहे, विरोधकांची आघाडीच मुळात आभासी असल्यामुळे त्यांची बैठक आभासी होणे स्वाभाविक आहे, असे म्हणत नड्डा यांनी इंडिया आघाडीला जोरदार टोला लगावला. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व घटकांचा विकास करण्याचा अजेंडा ठेवतात तर दुसरीकडे विरोधकांची इंडिया आघाडी परिवार वाचवा आणि संपत्ती वाचवा हे दोन अजेंडे ठेवून काम करत आहेत. असेही ते म्हणाले. परिवारवादाचे उदाहरण देताना पवार, ठाकरे, स्टॅलिन, वायएसआर रेड्डी, के सी राव, फारुख अब्दुल्ला, मुफ्ती मोहम्मद अशा अनेक लोकांचीही उदाहरणे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकारणाची व्याख्या बदलली आहे. विरोधकांना मुद्दे सापडत नाहीत आणि भरकटलेले विरोधक कुठलाही मुद्दा काढतात. काँग्रेस ओबीसीबद्दल बोलते मात्र ओबीसीसाठीचे अनेक अहवाल पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते राजीव गांधींनी ताटकळत ठेवले. याउलट ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने दिला, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT