Latest

Jos Buttler : जोस बटलरवर मोठी कारवाई! बीसीसीआयने ठोठावला दंड

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरला (Jos Buttler) गुरुवारी (दि. 11) रात्री कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यानंतर बीसीसीआयने दंड ठोठावला आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तो दोषी आढळला असून, त्याने चूक मान्य केली आहे.

कालच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने आरआरसमोर विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य ठेवले होते. राजस्थानने ही धावसंख्या 13.1 षटकांत 1 विकेटच्या मोबदल्यात आरामात गाठली. या सामन्यात बटलर (Jos Buttler) खाते न उघडता धावबाद झाला होता.

आयपीएलच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, 11 मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल राजस्थान रॉयल्सचा जोस बटलरला (Jos Buttler) शुल्काच्या 10 टक्के दंड आकारण्यात आला आहे.

बटलरने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत लेव्हल एकचा गुन्हा कबूल केला आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे. आचारसंहितेच्या लेव्हल एक भंगासाठी, सामनाधिकाऱ्याचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. हे कलम क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, मैदानावरील उपकरणांच्या गैरवापराशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बटलर धावबाद झाल्यानंतर तंबूत परतत असताना त्याने रागाने त्याची बॅट बाऊंड्रीवर मारली. या चुकीची दखल सामनाधिका-यांनी घेत त्याला शिक्षा ठोठावली.

सामन्याबद्दल चर्चा करायची झाल्यास, यशस्वी जैस्वाल सोबत ताळमेळ साधता न आल्याने जोस बटलर धावबाद झाला. पण या सामन्यात यशस्वीने या सामन्याचे चित्रच पालटले. 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना या फलंदाजाने एकहाती नाबाद 98 धावांची खेळी साकारली. यशस्वीने पहिल्या षटकात 26 धावा वसूल करून अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक ठोकले. आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. त्याने आपल्या धुवांधार खेळीत एकूण 13 चौकार आणि 5 उत्तुंग षटकार फटकावले. या विजयासह राजस्थान गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT