Latest

जयंत पाटील-तटकरेंच्या भेटीची चर्चा

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे एकत्र छायाचित्र व्हायरल झाल्यावरून सोमवारी विधानभवनात उलटसुलट चर्चा रंगली. आता जयंत पाटीलही सोडचिठ्ठी देतात की काय, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, स्वतः पाटील यांनी याबाबतचा निर्वाळा देत आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केल्यामुळे चर्चेचा धुरळा खाली बसला.

पाटील म्हणाले, खासदार तटकरे आणि मी दोन वेगवेगळ्या पक्षांत आहोत. विधिमंडळात आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एकमेकांना भेटू शकतो. आमचे व्यक्तिगत संबंध असू शकतात, त्याचा राजकीय अर्थ काढण्याचे कोणतेच कारण नाही. आता अजित पवारांसोबत गेलेले 6 आमदार हे माझ्यासोबत लॉबीत बसलेले होते. 3 आमदारांनी माझ्यासोबत जेवण केले. याचा अर्थ काही वेगळा होत नाही. त्यामुळे कोणीही गैरसमज निर्माण करू नये.

दरम्यान, निधीवाटपात दुजाभाव झाल्याचे वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. यावर पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांच्या मतदारसंघांत निधीवाटप झालेला दिसत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा शहरी मतदारसंघ आहे. त्यामुळे नगरविकास खात्यामार्फत त्यांना निधी मिळू शकतो, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT