Latest

सोलापूर : राज्‍यात सत्‍तेचे गुन्हेगारीकरण सुरू : जयंत पाटील

निलेश पोतदार

टेंभुर्णी ; पुढारी वृत्‍तसेवा पोलीस ठाण्यात एक आमदार गोळीबार करतो. माझ्याकडून कोट्यवधी रुपये घेतले असे आरोप करतो. राज्याच्या इतिहासात अशी घटना कधीही घडली नव्हती. राज्यात सत्तेचे गुन्हेगारीकरण सुरू आहे असा राज्य सरकारवर घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टेंभुर्णी येथे जाहीर सभेत बोलताना केला.

मंगळवारी सायंकाळी टेंभुर्णीत ओम साई मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 'विजय निश्चित मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेळाव्यास संबोधित करताना माजी मंत्री जयंत पाटील बोलत होते.

पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यापासून २०१४ पर्यंत देशावर फक्त ५६ लाख कोटी कर्ज होते. ते भाजपची सत्ता सुरु झाल्यापासून दहा वर्षात २०५ लाख कोटी एवढे झाले आहे. हे कर्ज मोठ्या उद्योगपतींच्या कर्ज माफीमुळे वाढले असल्याची टीका पाटील यांनी केली. ते म्हणाले की, जन्मलेल्या बालकांवर ही दीड लाख कर्जाचा बोजा झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने इशारा दिला आहे की, आणखी कर्ज वाढले तर श्रीलंकेसारखी स्थिती होईल. सरकारवर चौफेर हल्ला करताना पाटील म्हणाले की, अलीकडील अनेक घटनांवरून महाराष्ट्राचा बिहार झाला असल्याचे दिसून येत आहे. कायदा सुव्यवस्था राहिलेलीच नाही. ठेकेदाराकडून इशारा दिला जात आहे की, आम्हाला संरक्षण द्या. तुमचे कार्यकर्ते पैसे मागतात.

प्रदेशाध्यक्ष पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आताच मी येथे आलो असताना समजले की, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दोन्ही काढून घेण्यात आले आहे. पक्ष हिसकावून घेतले जात आहेत. परिस्थिती कशीही असली तरी कार्यकर्ते न घाबरता संकटास तोंड देतील. शरद पवार म्हणजेच पक्ष आहे. ते म्हणजेच सर्व काही आहे. एका विचाराने पवार साहेब यांना साथ देण्याचे कार्य भविष्यात कराल अशी अपेक्षा करतो. शरद पवार यांना सहानुभूती आहे. यामुळे या मतदार संघाचा निकाल शरद पवार ज्या बाजूने आहेत त्‍या बाजुने लागेल असा मला विश्वास आहे असे ते म्हणाले. राज्यात नवे अन्याय,अत्याचार घडत आहेत. राज्य अस्थिर ठेवण्याचे षडयंत्र केले जात आहे असा गंभीर आरोप ही पाटील यांनी शासनकर्त्यांवर केला.

जागृत रहा, सावध रहा. बूथ कमिटी तयार करा असा आदेश दिला. देशात, राज्यात होणारी मत मतांतरे ऐकण्याची सवय लावा. त्यातून विचार करा असा सल्ला ही पाटील यांनी दिला. आरक्षण विषयी पाटील म्हणाले की, ओबीसी, मराठा व धनगर समाज आरक्षणाचा योग्य निर्णय सरकारला घेता आलेला नाही.

प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करण्याची व्यवस्था करून ठेवली जात आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की, जणाची नाही निदान ….तरी ठेवा. यांना कुठेतरी आवरा, ब्रेक लावा.

आपण सत्तेत बसलेलो असतो तेव्हा महाराष्ट्र धर्म जागविण्यासाठी, वाढविण्यासाठी, सत्ता लोकांच्या हितासाठी राबविण्यासाठी काय प्रयत्न केले. प्रगती करण्यासाठी काय प्रयत्न केले हा विषय राहतो.

यावेळी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, अभिजित पाटील, प्रदेश निरीक्षक शेखर माने, नागेश फाटे, अभयसिंह जगताप, तुकाराम मस्के, बाळासो पाटील, संजय पाटील-घटनेकर, माढा तालुकाध्यक्ष औदुंबर देशमुख, नेहरू भवानी क्षेत्री आदींची जोशपूर्ण भाषणे झाली. या मेळाव्यास पदाधिकारी, शेतकरी, कार्यकर्ते आदींनी तुडुंब गर्दी केली होती.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT