Latest

Jawaharlal Nehru University : जागतिक विद्यापीठ क्रमवारीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विसाव्या क्रमांकावर

backup backup
प्रशांत वाघाये; नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला जगभरातील प्रतिष्ठित क्रमवारीत विसावे स्थान मिळाले आहे. लंडनमधील प्रसिद्ध उच्च शिक्षण विषयक विश्लेषण करणारी संस्था क्वाक्वेरेली सायमंड्सने (क्युएस) जगभरातील प्रतिष्ठित विद्यापीठांची क्रमवारीनुसार यादी जाहीर केली आहे. यात पहिल्या २० विद्यापीठांमध्ये भारतातील एकमेव विद्यापीठाचा समावेश आहे. या निमीत्ताने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने जागतिक स्तरावर पुन्हा एकदा भारताचा ठसा उमटवला आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने 'डेव्हलपमेंट स्टडीज' या विषयात जागतिक स्तरावर विसाने स्थान पटकावुन गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी भारताची प्रतिमा आणखी मजबूत केली आहे. विविध पातळ्यांवर केलेल्या परीक्षणात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने ८१.३ गुणांसह क्युएसच्या श्रेणीत विसावे स्थान मिळवले. दरम्यान, डेव्हलपमेंट स्टडीज विभागात ससेक्स विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, सोएस विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि केंब्रिज विद्यापीठाने पहिले पाचमध्ये स्थान पटकावले.
क्वाक्वेरेली सायमंड्सने (क्युएस) ही जागतिक स्तरावरील उच्च शिक्षण क्षेत्रातील सेवा, आणि विश्लेषण करणारी आघाडीची संस्था आहे, जगभरात प्रेरित लोकांना शैक्षणिक उपलब्धी, आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि करिअर विकासाद्वारे त्यांची क्षमता पूर्ण करण्यासाठी सक्षम करणे हे या संस्थेचे ध्येय आहे. क्युएसने जाहीर केलेल्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीनुसार, चेन्नई येथील सविथा वैद्यकीय आणि तांत्रिक विज्ञान संस्थेने देखील दंतचिकित्सा विषयासाठी जागतिक स्तरावर चोविसावा क्रमांक पटकावला आहे. तर अहमदाबाद, बंगळुरू आणि कोलकाता येथील प्रतिष्ठित भारतीय व्यवस्थापन संस्थानने (आयआयएम) व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासासाठी जागतिक स्तरावर पहिल्या ५० मध्ये स्थान मिळवले आहे. क्युएसनुसार, क्युएस जागतिक विद्यापीठ क्रमांकाच्या यंदाच्या आवृत्तीमध्ये पाच विस्तृत विषय क्षेत्रांमध्ये एकुण ५५ विषय आहेत. त्यासाठा या वर्षी १५५९ संस्थांना त्यांच्या विषयांनुसार क्रमवारी देण्यात आली आहे.

जागतिक क्रमवारीत भारतीय विद्यापीठाने स्थान मिळवणे हे अभिमानास्पद : ऍड. दीपक चटप

 दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या या क्रमवारीवर प्रतिक्रिया देताना लंडनच्या सोएस विद्यापीठाचे माजी विद्यार्थी चेव्हनिंग स्कॉलर ऍड. दीपक चटप म्हणाले की, "जागतिक क्रमवारीत भारतीय विद्यापीठाने स्थान मिळवणे ही बाब अभिमानास्पद आहे. भारतातील विद्यापीठ जागतिक मानकांनुसार तयार झाल्यास येणाऱ्या काळात अनेक विदेशातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात येतील. आज अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विदेशात जातात. भारतातील विद्यापीठ जागतिक पातळीवर आल्यास देशातील विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल."

उच्च शिक्षण क्षेत्रात देश योग्य दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे : जेसिका टर्नर

"भारत उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता, प्रवेश आणि जागतिक स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी योग्य दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे," असे प्रतिपादन क्युएसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जेसिका टर्नर यांनी केले. "आव्हानांचा सामना करूनही, देश आंतरराष्ट्रीय शैक्षणिक समुदायात निर्विवादपणे आपले स्थान निर्माण केले आहे."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT