पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलमधील 36 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध 21 धावांनी जिंकला. कोलकाताने विजयाची नोंद केली, पण त्यांच्या एका फलंदाजाला बीसीसीआयने मोठा दंड ठोठावला.
वास्तविक, कोलकाताचा सलामीवीर जेसन रॉयने (Jason Roy) 29 चेंडूंत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. त्याने एकाच षटकात 4 षटकार ठोकले. त्याने केकेआरच्या डावातील सहाव्या षटकात शाहबाज अहमदच्या सलग तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले. त्यानंतर पाचवा बॉल डॉट घालवला, पण पुन्हा शेवटचा चेंडू चेंडू सीमापार पाठवला. मात्र, हा सामना संपल्यानंतर बीसीसीआयला त्याची एक कृती अजिबात आवडली नाही आणि त्यासाठी त्याला दंड ठोठावण्यात आला आहे.
झाले असे की, 10 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आरसीबीचा गोलंदाज विजयकुमार वैशाखने रॉयला क्लीन बोल्ड केले. बाद झाल्यानंतर रॉयला राग आला आणि त्याने आपली बॅट जमिनीवर पडलेल्या बेल्सवर आपटली. तसेच पॅव्हेलियनमध्ये परतत असताना आपला राग व्यक्त करून बॅट हवेत फेकली. त्याची कृती बीसीसीआयल आवडली नाही. त्यामुळे रॉयवर कारवाई करून त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावला.
प्रथम फलंदाजी करताना जेसन रॉय (56) आणि कर्णधार नितीश राणा (48) यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर कोलकाताने 200 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना, कर्णधार विराट कोहली (54) याने आरसीबीसाठी चांगली खेळी खेळली, परंतु त्याला इतर कोणत्याही फलंदाजाची साथ मिळू शकली नाही आणि केकेआरने या हंगामात दुसऱ्यांदा आरसीबीचा पराभव केला.