Latest

हजारोंची गर्दी आणि अदम्य उत्साह ! पाहा मराठा मोर्चाचे खास फोटो

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  एक मराठा, लाख मराठा… ही केवळ शाब्दिक घोषणा उरलेली नाही, तर मराठा समाजाच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी लाखो सर्वसामान्य समाजजण स्वयंस्फूर्तीने घराबाहेर पडत रस्त्यावर आले. या जनसागराला पुण्यनगरीतील जनांचा प्रवाह आज बुधवारी मिळाला अन् खर्‍या अर्थाने भव्य बनलेले हे भगवे वादळ दिवसभर पुण्यात गर्जना करून रात्री पिंपरीमार्गे लोणावळ्याकडे रवाना झाले. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, याचा पुनरुच्चार पुण्यातील वाटचालीत मराठा आरक्षण मोर्चाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी केला आणि त्याला लाखो जनांनी उत्स्फूर्तपणे घोषणा करीत अनुमोदन दिले.

जरांगे यांचा भव्य मोर्चा काल दिवसभर पुण्यात सुरू राहिला. हजारो लोक पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरल्याने त्यांची पायी दिंडी संथगतीने मार्गस्थ होत होती. सायंकाळपर्यंत ते पुणे शहरातच होते. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जरांगे मध्यरात्रीनंतर लोणावळा येथे मुक्कामासाठी पोहचले. जरांगे बुधवारी पहाटे वाघोली येथे मुक्कामी पोहचले. तेथे पहाटे साडेचार वाजता जाहीर सभा झाली. कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात सापडत असून, ओबीसीमधून आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घ्यायची नाही. गोळ्या झाडल्या तरी चालेल; पण आरक्षण घेणारच, असा इशारा जरांगे यांनी दिला. त्यांच्या स्वागतासाठी रात्री थंडीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाघोली येथून आज सकाळी दहा वाजता जरांगे यांची पायी दिंडी मुंबईच्या दिशेने निघाली. सकाळी साडेआठ वाजल्यापासूनच लोकांची रस्त्यावर गर्दी होण्यास सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा जरांगे यांची वाट पाहत लोक थांबले होते. हातात झेंडे, डोक्यावर मराठा आरक्षणाचा उल्लेख केलेल्या भगव्या टोप्या, एक मराठा लाख मराठा लिहिलेली उपरणे, टाळ-मृदंगांचा गजर करीत नागरिक पदयात्रेमध्ये सहभागी होत होते. लोकांचा जथ्था वाढतच होता. नगर रस्ता गर्दीने भरून गेला होता. मराठा बांधवांमध्ये मोठा उत्साह होता. जरांगे यांचे ठिकठिकाणी सत्कार करण्यात होते. गर्दीमुळे जरांगे यांचे वाहन संथगतीने पुढे सरकत होते. वाघोलीतून खराडी बायपास चौकात ते एक वाजण्याच्या सुमाराला पोहचले. तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

खराडीपासून पुढे चंदननगर, विमाननगरमार्गे जरांगे रामवाडी येथे दुपारी चार वाजता पोहचले. येरवडा येथील गुंजन चौकात मुस्लिम समाजाच्या वतीने जरांगे यांचे स्वागत करण्यात आले. तेथे ते पाच वाजता पोहचले. तेथून ते बंडगार्डन पुलावरून रेल्वे स्थानकाकडे जाणार होते. मात्र, त्या मार्गावर मोठी हॉस्पिटल असल्याने मार्ग बदलण्याची पोलिसांनी केलेली विनंती जरांगे यांनी मान्य केली. ते संगमवाडीमार्गाने पाटील इस्टेटच्या दिशेने गेले.

तेथून पदयात्रा संचेती हॉस्पिटलजवळ सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमाराला पोहचली. तेथे शंभर किलो वजनाचा भव्य हार त्यांना घालण्यात आला. फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. तेथे जरांगे यांनी थोडक्यात त्यांचे म्हणणे मांडले. तेथून कृषी महाविद्यालयापासून जरांगे यांची पदयात्रा विद्यापीठ चौकात रात्री साडेआठच्या सुमाराला पोहचली. मार्गांवर आजूबाजूच्या परिसरातून आलेल्या लोकांनी गर्दी केली होती. जरांगे यांच्यासमवेत हजारो लोक चालत होते.

औंध येथे जरांगे यांची पदयात्रा सव्वानऊच्या सुमाराला पोहचली. औंध, पाषाण, बाणेर, बालेवाडी, सोमेश्वरवाडी या भागातून आलेले नागरिक तेथे दोन-तीन तास त्यांची वाट पाहत थांबले होते. तेथे जरांगे यांचे दहा मिनिटे भाषण झाले. त्यांनी सर्वांना मुंबईला येण्याचे आवाहन केले. त्यानंतर पुणे महापालिकेच्या हद्दीतून त्यांनी 9 वाजून 35 मिनिटांनी सांगवी फाटा येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत प्रवेश केला.

पुणे शहरात बारा तास पदयात्रा
मनोज जरांगे सकाळी आठ वाजता वाघोलीतून निघणार होते, तर सांगवी फाटा येथे दुपारी बारा वाजता पोहचण्याची नियोजित वेळ होती. चिंचवडमधील डांगे चौक येथे दुपारी दोन वाजता, तर निगडीला सायंकाळी पाच वाजता पोहचणार होते. मात्र, पुण्यातील लोकांच्या उत्स्फूर्त गर्दीमुळे नियोजित वेळेपेक्षा सुमारे साडेनऊ तास उशिराने ते पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत सांगवी फाटा येथे पोहचले. सकाळी दहापासून रात्री साडेनऊपर्यंत सुमारे बारा तास जरांगे यांची पदयात्रा पुणे शहरात होती. तेथे ठिकठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांनी काही ठिकाणी थोडक्यात भाषण केले.

SCROLL FOR NEXT