Latest

जरांगेंनी मागितली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची माफी

दिनेश चोरगे

अंतरवाली सराटी; पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याप्रकरणी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागितली आहे. मी आई – बहिणीवरून अपशब्द वापरले असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. माझे शब्द मागे घेतो, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे ते सरकारविरोधात बॅकफूटवर गेल्याचे दिसून येत आहे.
जरांगे यांनी आपल्या आमरण उपोषणावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. त्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. सरकारनेही याप्रकरणी कठोर भूमिका घेतल्यानंतर जरांगे यांनी मंगळवारी एक पाऊल मागे घेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची माफी मागितली आहे.

माझे शब्द मागे घेतो

मी कसलीही शिवीगाळ केली नाही. ते आमरण उपोषण होते. झाला प्रकार अनावधानाने झाला. मी आई-बहिणीवरून शिव्या दिल्या नाहीत. मात्र, त्यांनी विधान भवनाच्या पटलावर मी असे बोलल्याचा दावा केला असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. आमच्यासाठी आई-बहिणींहून काहीच मोठे नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगी बाणवलेले लोक आहोत, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे जरांगे यांनी गेल्या रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करून त्यांच्या मुंबईस्थित सागर बंगल्यावर धडक देण्याचा निर्धार केला होता. तथापि, सरकारने कठोर भूमिका घेतल्यानंतर ते अर्ध्या रस्त्यातूनच माघारी परतले होते.

विधिमंडळात तीव्र पडसाद

जरांगे यांच्या विधानाचे मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातही तीव्र पडसाद उमटले. सत्ताधारी आमदारांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करत जरांगे यांना अटक करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची माफी मागितली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT