Latest

जपानचे ‘स्लिम’ चंद्रावर दुसर्‍या रात्रीही टिकले!

Arun Patil

टोकियो : जपानच्या 'स्लिम' या लुनार लँडरने चांद्रभूमीवर उतरताच मान टाकली होती. त्यावेळी त्याच्या सोलर पॅनेलची दिशा हलल्यामुळे ऊर्जानिर्मिती होत नव्हती. मात्र हा बिघाड दुरुस्त केल्यानंतर आता या लँडरने थक्क करणारा चिवटपणा दर्शवला आहे. या लँडरने चंद्रावरील चौदा दिवसांची दुसरी रात्रही पार पाडून आपण अद्याप 'जिवंत' असल्याचे दाखवले आहे! विशेष म्हणजे चंद्रावरील दीर्घ रात्रीच्या वेळी ते टिकून राहिल असे त्याचे डिझाईन बनवलेले नव्हते. तरीही हे लँडर दोन रात्री उलटल्यावरही टिकले आहे!

जपानने हे लँडर यशस्वीपणे चंद्रावर उतरून असे करणारा जगातील पाचवा देश बनण्याचा मान मिळवला होता. यापूर्वी अमेरिका, रशिया, चीन आणि भारताने चंद्रावर आपले लँडर यशस्वीपणे उतरवले आहेत. आता 'स्लिम'ने चंद्रावरील दीर्घ आणि थंड अशा दोन रात्रींचा सामना करून आपले काम सुरू ठेवले आहे. मिशन टीमने 'एक्स'वरून याबाबतची माहिती दिली. 'स्लिम'ने दुसर्‍यांदा चंद्रावरील रात्र पार पाडल्याचे त्यामध्ये सांगण्यात आले.

या लँडरच्या नेव्हीगेशन कॅमेर्‍याने टिपलेला एक फोटोही 'जाक्सा' या जपानी अंतराळ संशोधन संस्थेने शेअर केला आहे. "स्लिम'च्या नावाचा लाँग फॉर्म 'स्मार्ट लँडर फॉर इन्वेस्टीगेटिंग मून' असा आहे. हे लँडर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये चंद्राकडे पाठवण्यात आले होते व ते 19 जानेवारीला चांद्रभुमीवर उतरले. सौरऊर्जेवर चालणारे हे लँडर त्यावेळी त्याच्या नाकावर उतरले होते! त्यामुळे 200 किलो वजनाचे हे लँडर काम करीत नव्हते. अखेर 28 जानेवारीला त्याच्यामधील बिघाड दुरुस्त झाला आणि त्याने डेटा गोळा करण्यास सुरुवात केली.

SCROLL FOR NEXT