Latest

तरुण उलगडताहेत काश्मीरचे अंतरंग; मुश्ताक अली अहमद खान यांची माहिती

अमृता चौगुले

पुणे : 'जम्मू-काश्मीरमधील अस्थिर वातावरणातही लोकांमधील सकारात्मकता अजूनही कायम आहे. 1989 मध्ये येथील चित्रपटगृहे दहशतवाद्यांनी बंद केल्यानंतर आज येथे एकही चित्रपटगृह नाही. तरीही इथला तरुण आपल्या चित्रपटातून खर्‍या जम्मू-काश्मीरचे अंतरंग लोकांसमोर आणतोय,' अशी माहिती मुश्ताक अली अहमद खान यांनी दिली.

'सरहद'तर्फे जम्मू-काश्मीर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सध्या पुण्यात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर महोत्सवाचे संयोजक मुश्ताक अली अहमद खान यांच्याशी दै. 'पुढारी'ने विविध विषयांवर संवाद साधला. जम्मू-काश्मीरमधील तरुणांमधील चित्रपटप्रेमाविषयी सांगताना खान म्हणाले, 'सध्या येथे मनोरंजनाचे कोणतेही साधन नसले तरी येथील लोक चित्रपट बघताहेत अन् येथील तरुण हौसेने मोबाईल अन् छोट्या कॅमेर्‍याद्वारे चित्रपट बनवत आहेत. मी स्वत: अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. जम्मू-कश्मीरमध्ये चित्रपट महोत्सव करावा, असे वाटले अन् मी महोत्सव आयोजित करू लागलो. येथे महोत्सव करणे खूप अवघड आहे. परंतु, गेल्या पाच वर्षांपासून मी जम्मू-काश्मीरमधील लोकांना चित्रपट दाखवतोय. चित्रपट पाहून लोक खूष होतात.

त्यांना चांगले चित्रपट दाखवायचे आहेत, तो प्रयत्न आताही सुरू आहे. पुण्यात सुरू असलेला चित्रपट महोत्सव हा फक्त जम्मू-काश्मीरवर आधारित आहे. जम्मू-काश्मीरबाबत जे गैरसमज पसरविले जातात, ते दूर करण्यासाठी अन् खरे जम्मू-काश्मीर लोकांना कळावे, यासाठी हा महोत्सव आम्ही घेत आहोत. खूप सकारात्मक चित्रपट आले आहेत. येथील तरुण खूप सकारात्मक विचारांचे आहेत. ते खर्‍या आणि अंतरंगातील काश्मीरवर खूप चांगले चित्रपट बनवत असून, प्रत्येक चित्रपटातून ते सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहेत.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT