Latest

जळगाव : निवासी उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांवर वाळू माफियांचा प्राणघातक हल्ला

निलेश पोतदार

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांकडून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर हल्ले करणे सुरूच आहेत. मात्र आता उपजिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला करण्याची घटना समोर आली आहे. प्रांत, तलाठी यांच्यावर आजपर्यंत हल्ले झालेलेच आहेत, मात्र प्रथमच उपजिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी हे जखमी झाले आहेत. यावरून पोलिसांचा व महसूल विभागाचा धाक संपला आहे की काय अशी परिस्‍थिती निर्माण झाली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील गिरण नदीच्या वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि शासनाच्या नियमानुसार अजून पर्यंत या वाळूचा लिलाव झालेला नाही. रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक होत आहे. या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यात अनेक वेळा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ले झालेले आहेत.

निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आणि तहसीलदार बनसोडे हे दिनांक 6 राेजीच्या रात्री भुसावळच्या दिशेने शासकीय कार्यक्रमाला जागा पाहण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असतांना पावणेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांना राष्ट्रीय महामार्गावर महेंद्रा शोरूमच्या जवळ वाळूचे डंपर दिसले. त्यांनी तहसीलदार बनसोडे यांना या डंपरवर कारवाई करण्यास सांगितले. यानुसार कारवाई सुरू असतांनाच दुसरे डंपर आले. तर, थोड्याच वेळात दुचाकी व चारचाकीतून वाळू माफिया आले. या टोळक्याने निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार व तहसीलदार बनसोडे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढविला. यात सोपान कासार हे जखमी झाले असून त्यांच्या शासकीय वाहनाचे देखील नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अ्रधिक्षक महेश्‍वर रेड्डी यांच्यासह अधिकार्‍यांनी रुग्णालयात रात्रीच भेट दिली होती. याप्रमाणे नशिराबाद पोलिसात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आली आहे. सोपान कासार यांना शासकीय वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच एरंडोल येथील प्रांताधिकार्‍यांवर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना ताजी असतांना थेट निवासी उपजिल्हाधिकार्‍यांवर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. महसूल विभागाने पकडलेले डंपर किंवा तहसीलदार तलाठी यांच्यावर अनेक वेळा हल्ले झालेले आहेत. काही दिवसांपूर्वीच भुसावळ तहसील कार्यालयाच्या वाहनावर गाडी घातली होती. एका शेतकऱ्याच्या शेतात डंपर घालून त्याचे नुकसानही केलेले होते. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT