Latest

Jalgaon Crime | लाचखोर विद्युत निरिक्षक एसीबीच्या जाळ्यात

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
शासनाचा इलेक्ट्रिक विभागाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराने परवाना नूतनीकरणासाठी दिला असता त्याबदल्यात पंधरा हजार रुपयाची लाच घेणाऱ्या विद्युत निरीक्षकाला जळगाव अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ अटक केली आहे.

जिल्ह्यामध्ये लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरूच असून अँटी करप्शन ब्युरो जळगाव यांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. राज्य शासनाची इलेक्ट्रिकची कामे घेण्यासाठी ठेकेदाराला इलेक्ट्रिक परवाना आवश्यक असतो. त्यासाठी तक्रारदार हा इलेक्ट्रिकचे ठेका घेत असल्याने त्याने परवाना नूतनीकरणासाठी उद्योग, उर्जा व कामगार विभाग जळगाव यांच्याकडे रीतसर कागदपत्रे सुपूर्द केली होती.  मात्र उद्योग उर्जा व कामगार खात्यात विद्युत निरिक्षक-वर्ग १ या पदावर कार्यरत असणारे गणेश नागो सुरळकर यांनी परवाना नूतनीकरणासाठी पंधरा हजार रुपयाची लाच तक्रारदाराकडे मागणी केली. याबाबत तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो जळगाव यांच्याकडे तक्रार केली असता उपअधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहायक फौजदार सुरेश पाटील, पोलीस कॉन्सटेबल प्रदिप पोळ, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर, अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव तसेच रविंद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळू मराठे व अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने सापळा टाकून मंगळवारी (दि.27) रोजी विद्युत निरिक्षक-वर्ग १ या पदावर कार्यरत असणारे गणेश नागो सुरळकर यांना 15 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. याबाबत जिल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT