Latest

Chandrayaan-3 : मोदी सरकारचा इस्रोला सर्वाधिक बूस्टर

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अंतराळ संशोधनाला सर्वाधिक बूस्टर नरेंद्र मोदी सरकारच्या काळात मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाशक्ती होण्याच्या दिशेने सुरू झालेल्या भारताच्या वाटचालीत 23 ऑगस्टला आणखी एक नवा विक्रम नोंदविला जाणार आहे.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकावरून शुक्रवारी तिसर्‍या चांद्रयान मोहिमेचे प्रक्षेपण झालेले आहे. यानाच्या विक्रम लँडरने येत्या 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले की, मोदी सरकारच्या काळात भारत जगातील पहिल्या चार अर्थव्यवस्थांमधील समावेशापाठोपाठ आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित करणार आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार्‍या अमेरिका, रशिया, चीन या जगातील तीन देशांची यादी भारत विस्तारणार आहे. अंतराळात असे यश मिळविणार्‍या पहिल्या 4 देशांच्या यादीत झळकणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या विक्रमात आणखी एक विक्रम दडलेला आहे. तो असा की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ही किमया करून दाखवणारा भारत जगातील पहिला व एकमेव देश ठरणार आहे.

भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारतात 1960 च्या दशकात अंतराळ संशोधनाला सुरुवात झाली. 1962 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना झाली. याच वर्षी तिरुअनंतपुरमलगत थुम्बा रॉकेट लाँचिंग स्टेशनचे कामही सुरू झाले. (हे आता सतीश धवन अंतराळस्थानक म्हणून ओळखले जाते.) पुढे 7 वर्षांनी इंदिरा गांधींच्या काळात 'इस्रो' असे या समितीचे नामकरण करण्यात आले.

नेहरूंनंतरच्या सरकारांचा तौलनिक आढावा घेतला असता मोदी सरकारच्या काळात सर्वाधिक 47 अंतराळ मोहिमा 'इस्रो'ने राबविल्या आहेत. नरसिंह राव सरकारच्या काळात 5, अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात 6, मनमोहन सिंग सरकारच्या काळात 24 मोहिमा राबविण्यात आल्या होत्या. या हिशेबाने पाहू जाता मोदी सरकारची अंतराळ संशोधन क्षेत्रातील प्रगती लक्षणीय आहे.

तत्पूर्वीही आर्यभट्ट, भास्कर अशा मोहिमा भारताने पार पाडल्या. इंदिरा गांधींच्या काळात रशियासोबतच्या संयुक्त मोहिमेत अंतराळात राकेश शर्मा या पहिल्या भारतीयाचे पाऊल पडले.

सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा

अंतराळ शक्ती म्हणून जगात भारताची ओळख निर्माण करणार्‍या मोहिमांची खर्‍याअर्थाने सुरुवात 3 एप्रिल 1984 रोजी झाली होती. पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांनी भारताच्या वतीने अंतराळात पहिले पाऊल टाकले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना विचारले, वरून आमचा भारत कसा दिसतो? शर्मा म्हणाले, 'सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा…'

SCROLL FOR NEXT