Latest

इस्रायलचे लक्ष्य आता भुयारांत दडलेली हमास; गाझातील अनेक बोगद्यात समोरासमोर युद्ध; माऱ्यासमोर हमासच्या नांग्‍या

Arun Patil

तेल अवीव, वृत्तसंस्था : गाझामध्ये रणगाड्यांसह घुसल्यानंतर भुयारांवर इस्रायलने हल्लाबोल केला आहे. हमासचे दहशतवादी दडून असलेली भुयारे शोधून ती इस्रायलकडून लक्ष्य केली जात आहेत. भुयारांतून अनेक ठिकाणी इस्रायली जवान आणि हमासचे दहशतवादी समोरासमोर उभे ठाकले. सर्वच लढायांतून हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली जवानांसमोर नांग्या टाकल्या.

भुयारांतील हमासचे अनेक तळ या क्षणापर्यंत आम्ही नेस्तनाबूत केले आहेत. हमासची 300 ठिकाणे होत्याची नव्हती झाली आहेत, असे इस्रायली सैन्याकडून सांगण्यात आले. हमासच्या एका म्होरक्याचाही यादरम्यान खात्मा झाला आहे.

गाझामध्ये इस्रायलकडून जमिनीवरील लढाई सुरूच आहे. त्यासह दररोज हवाई हल्लेही करण्यात येत आहेत. दक्षिण गाझातील राफा शहरात मोठे हल्ले इस्रायलकडून झाले. रणगाडेविरोधी क्षेपणास्त्र, रॉकेट लॉन्चिंग साईट्स, लष्करी तळे तसेच हमासची भूमिगत ठिकाणे इस्रायलचे लक्ष्य ठरली.

ओलिसांना आम्ही विनाशर्त सोडवू : इस्रायल

हमासने जारी केलेल्या या व्हिडीओला इस्रायलने प्रपोगंडा म्हटलेले असून, ओलिसांच्या सुटकेसाठी आम्ही लढतो आहोत आणि त्यांच्या सुटका आम्ही विनाशर्त करू, असा विश्वास व्यक्त केला आहे. हमासने 250 वर लोकांना ओलिस ठेवले आहे. आतापर्यंत केवळ 4 ओलिसांची सुटका करण्यात आली आहे.

नसीम अबू अजिना ठार

भुयारांतून लपलेल्या हमास दहशतवाद्यांवर इस्रायली सैनिकांनी केलेल्या चढाईत अनेक दहशतवादी मारले गेले. हमासचा एक म्होरक्या नसीम अबू अजिना याचा यादरम्यान खात्मा झाल्याचे इस्रायलकडून सांगण्यात आले. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या एरेज आणि नेतिव हासारा या शहरांवर झालेल्या हमासच्या हल्ल्याचा तो मास्टरमाईंड होता.

हमासच्या ताब्यातून महिला सैनिकास सोडविले

हमासच्या गोपनीय ठिकाणांवर इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांदरम्यान इस्रायली सैनिकांनी हमासच्या एका ठिकाणावरून हमासने ओलिस ठेवलेल्या आपल्या एका महिला सैनिकाची सुटका केली. ही महिला सैनिक आता आपल्या कुटुंबासोबत आहे.

हमासकडून ओलिसांचा व्हिडीओ

हमासने ओलिस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांचा एक व्हिडीओ जारी केला असून, 76 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये तीन इस्रायली महिला पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरोधात बोलत आहेत. हमासचा (इस्रायलच्या कैदेतील दहशतवाद्यांच्या सुटकेचा) प्रस्ताव स्वीकारा आणि आमची सुटका करा, असे या महिला ओरडत आहेत.

'गाझा रिकामे करा'

गाझामधील लोकांना फोनवरून शहर रिकामे करण्यास सांगण्यात येत आहे, असे 'अल जझीरा'च्या वार्ताहराने स्वत:चा हवाला देऊन सांगितले. याआधी इस्रायली लष्कराने विमानांतून पत्रके फेकून हमासशी संबंधित सर्व इमारती नष्ट केल्या जातील, असा इशारा सार्वजनिक केला होता.

इस्लामिक जिहादच्या चार जणांचा वेस्ट बँकेत खात्मा

वेस्ट बँक भागामध्येही परिस्थिती बिकट होत चालली आहे. इस्लामिक जिहादचे 4 सदस्य इथे मारले गेले आहेत. आतापर्यंत 120 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. 600 वर जणांना अटक करण्यात आली आहे. हे सारे हमासचे सदस्य असल्याचे सांगण्यात येते.

9,700 वर मृत्यू

युद्धात आतापर्यंत 9 हजार 700 हून अधिक लोक मरण पावले आहेत. 1400 वर इस्रायली, तर 8 हजार 306 पॅलेस्टिनींचा त्यात समावेश आहे.

SCROLL FOR NEXT