Latest

रक्‍तरंजित संघर्ष चिघळणार! आता इस्‍त्रायलचे टार्गेट रफाह, इजिप्‍तने दिला घातक परिणामांचा इशारा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आंतरराष्‍ट्रीय दबावाला न जुमानता इस्त्रायली सैन्य दक्षिण गाझा पट्टीतील इजिप्तच्या सीमेला लागून असलेल्‍या रफाह शहरामध्ये लष्‍कर कारवाईसाठी सज्‍ज झाले आहे. या कारवाईसाठी केवळ सरकारच्‍या आदेशाची सैन्‍य प्रतीक्षा करत आहे, असे वृत्त 'टाईम्‍स ऑफ इस्रायल'ने वरिष्‍ठ अधिकार्‍यांच्‍या हवाल्‍याने दिले आहे. इस्‍त्रायलच्‍या या कारवाईची गंभीर दखल इजिप्‍तने घेतली आहे. रफाहमधील लष्करी कारवाई केल्‍यास याचे घातक परिणाम होतील, असा इशारा इजिप्‍तने इस्‍त्रायलला दिला आहे. तर अमेरिकेने इस्‍त्रायलला संयम राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्‍यान, ७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी सुरु झालेल्‍या हमासने केलेल्‍या हल्‍ल्‍यास इस्‍त्रायलने दिलेल्‍या प्रत्‍युत्तर आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक नागरिक मृत्‍यूमुखी पडले आहेत.

इस्‍त्रायलने रफाह शहर ताब्यात घेण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. आता सरकारची मान्‍यता मिळताच इस्‍त्रायल सैन्‍य ऑपरेशन सुरू करेल. इस्रायल गाझामधील लोकसंख्येचे शेवटचे मुख्य केंद्र असलेल्या रफाहवर हल्ला करण्यासाठी पुढे जाईल, जिथे इस्रायली सैन्य अद्याप पोहोचलेले नाही, असे काही दिवसांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले होते. आता नेतन्याहू यांच्या सरकारच्या प्रवक्त्याचे म्‍हटलं आहे की, इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने हल्ल्यापूर्वी रफाह येथून पॅलेस्टिनींना स्थलांतरित करण्यासाठी 40,000 तंबू खरेदी केले होते, प्रत्येक तंबूमध्ये 10 ते 12 लोक बसण्याची क्षमता आहे. दरम्‍यान, संयुक्‍त राष्‍ट्रांनीही इस्रायलला रफाह शहरावर हल्ला करण्यापासून रोखण्याचे आवाहन केले आहे.

रफाहमध्‍ये हमासचे मोठे तळ असल्‍याचा इस्‍त्रायलचा दावा

रफाहमध्‍ये हमासचे मोठे लष्‍करी तळ आहे, असा दावा इस्‍त्रायलने केला आहे. रफाहमध्ये हमासच्या चार लढाऊ बटालियन उपस्थित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

राफाहमध्‍ये कारवाईचे घातक परिणाम होतील : इजिप्‍तचे राष्‍ट्राध्‍यक्ष

राफाहमध्‍ये कोणत्याही लष्करी कारवाईचे घातक परिणाम होतील, असा इशारा इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल-फताह अल-सिसी यांनी दिली आहे. राफाह हे इजिप्तच्या सीमेला लागून आहे. येथे १० लाखांहून अधिक पॅलेस्टिनींना आश्रय दिला आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू झालेल्या युद्धानंतर स्‍थलांतर केलांनी येथे आश्रय घेतला आहे.

अमेरिकेचे इस्‍त्रायला संयम राखण्याचे आवाहन

इस्रायलचा सर्वात जवळचा मित्र अमेरिकेनेही रफाहवर हल्ला करण्याची योजना रद्द करण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, रफाह तेथे हमासचे दहशतवादी इतर मार्गांचा अवलंब करु शकतात. रफाहवरील इस्रायलचा हल्ला रोखण्यासाठी युद्धविरामासाठी अमेरिका, इजिप्त आणि कतार यांनी केलेले प्रयत्न आतापर्यंत अयशस्वी ठरले आहेत.

इस्रायलने दक्षिणेकडील गाझामधून आपले बहुतेक भूदल मागे घेतले, परंतु हवाई हल्ले सुरूच ठेवले आहेत. ज्या भागातून सैनिक परतले आहेत त्या भागात छापेमारी सुरु आहे. इस्रायलच्या लष्करी मोहिमेत आतापर्यंत त्यांच्या 34,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत, तर हजारो मृतदेह अजूनही ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT