Latest

Israel Air Attack : इस्रायलचा सीरियाच्या अलेप्पोमध्ये हवाई हल्ला, 38 जण ठार

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Israel Air Attack : इस्रायलच्या लष्कराने सीरियात मोठा हवाई हल्ला केला आहे. सीरियन माध्यमांनी एका लष्करी अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की अलेप्पोच्या उत्तरेकडील उसेक शहरातील नागरी वस्त्यांवर शुक्रवारी पहाटे इस्रायने हवाई हल्ला केला. त्याचवेळी एका सीरियन बंडखोर गटांने देखील ड्रोन डागले. या हल्ल्यात 38 लोक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये हिजबुल्लाहच्या पाच दहशतवाद्यांचाही समावेश आहे. तसेच मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ब्रिटन-स्थित युद्ध निरीक्षणकर्ता 'सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्स'ने सांगितले की, इस्रायच्या हवाई हल्ल्यादरम्यान अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील अलेप्पोच्या दक्षिणेकडील उपनगरातील जिब्रीनमधील लेबनीज दहशतवादी हिजबुल्ला गटाच्या क्षेपणास्त्र डेपोला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामध्ये डझनभर दहशतवादी मारले गेले, तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. हल्ल्याच्या दोन तासांनंतरही स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. या हल्ल्यांबाबत इस्रायली अधिकाऱ्यांकडून तात्काळ कोणतेही स्पष्टीकरण समोर आलेले नाही.

इस्रायलचा अनेकदा सीरियावर हल्ले

सीरियातील अनेक ठिकाणे इराणशी संबंधित आहेत. ही ठिकाणे दहशतवादी संघटनांचा अड्डा असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेकवेळी सीरियातील या ठिकांणांना इस्रायलकडून लक्ष्य केले जाते. मात्र, या हल्ल्यांवर इस्रायलकदून मौन बाळगले जाते. गुरुवारी (दि. 28) देखील सीरियाची राजधानी दमास्कसजवळ इस्रायलने हवाई हल्ला केल्याचे वृत्त तेथील माध्यमांनी दिले होते. त्या हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले होते.

सीरियामध्ये हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचे सशस्त्र अस्तित्व आहे. ही दहशतवादी संघटना सीरियातील वर्तमान संघर्षात सरकारी सैन्याला मदत करत आहे. अलेप्पो हे सीरियाचे सर्वात मोठे शहर आणि एकेकाळचे व्यावसायिक केंद्र आहे. सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद केले आहे. गाझामधील युद्ध आणि लेबनॉन-इस्रायल सीमेवर हिजबुल्लाह आणि इस्रायली सैन्यांमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून चकमकी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सीरियात हल्ले वाढले असल्याचे आंतरराष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

SCROLL FOR NEXT