पुढारी ऑनलाईन डेस्क : हमासला समूळ नष्ट करण्यासाठी इस्रायल सरकारने बुधवारी आपत्कालीन एकता सरकार स्थापन केले. तसेच दाट लोकवस्तीच्या पॅलेस्टिनी भागाच्या उत्तरेला सैन्य तैनात केले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बुधवारी (दि.११) युद्धकाळासाठी (Israel-Hamas war) आपत्कालिन सरकार स्थापन करण्यासाठी करार केला.
बेनी गँट्झच्या नॅशनल युनिटी पार्टीच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी माजी संरक्षण मंत्री आणि मध्यवर्ती विरोधी पक्षाचे नेते बेनी गॅंट्झ यांच्याशी आपत्कालीन मंत्रिमंडळ तयार करण्यास आणि केवळ युद्धावर लक्ष केंद्रित करण्यास सहमती दर्शविली. नॅशनल युनिटी पार्टीचे नेते बेनी गँट्झ यांनी पूर्वी सूचित केले होते की ते इस्रायलच्या युद्ध प्रयत्नांना चालना देण्यासाठी आणीबाणीच्या आपत्कालीन सरकारमध्ये बिनशर्त सामील होण्यास इच्छुक आहेत. त्यांनी एकता सरकार स्थापन करण्याच्या कराराची माहिती देणारे एक निवेदन सादर केले होते. निवेदनात म्हटले की, ते पाच सदस्यीय युद्ध व्यवस्थापन मंत्रिमंडळ तयार करावे. यात पंतप्रधान नेतन्याहू, गँट्झ, विद्यमान संरक्षण मंत्री योव गॅलंट आणि दोन उच्च अधिकारी निरीक्षक सदस्य म्हणून समाविष्ट असतील. (Israel-Hamas war)
युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन (US Secretary Visit Israel) आजपासून तीन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर आहेत. हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलला पाठिंबा दर्शवण्यासाठी मंत्री अँटोनी ब्लिंकन इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. "युनायटेड स्टेट्स इस्रायलच्या पाठीशी आहे. आज आम्ही त्यांच्या पाठीशी आहे, उद्या ते आमच्या असतील. आम्ही नेहमीच दृढतेने दहशतवादाच्या विरोधात उभे राहू," असे ब्लिंकन यांनी इस्रायलला निघण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले.
इस्रायली सैन्य आणि हमास दहशतवादी यांच्यात सुरू असलेले युद्ध वाढतच आहे. दोन्ही बाजूंनी तीव्र हल्ले होत आहेत. गाझा पट्टीवर सैन्याने बॉम्बफेक सुरू ठेवली असतानाही, इस्त्रायली सरकारने संयुक्त आघाडी सादर करण्यासाठी आपत्कालीन युद्ध मंत्रिमंडळाची स्थापना केली आहे. पॅलेस्टिनी हमासने सीमेचे उल्लंघन करून इस्त्राईलमध्ये आतापर्यंत १२०० हून अधिक नागरीकांना ठार मारले आहे. हमासच्या हल्ल्याचा बदला म्हणून इस्रायलकडून हल्ले सुरू आहेत. या युद्धात आतापर्यंत २२०० हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. २.३ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या एन्क्लेव्हला अन्न आणि इंधन पुरवठा थांबवून गाझाला इस्रायलने वेढा घातला आहे. दरम्यान, गाझा आरोग्य मंत्रालयाने इस्रायलच्या हल्ल्यांमुळे ११०० पॅलेस्टिनी ठार झाल्याचा दावा केला आहे. ५३५ इमारती नष्ट झाल्या आहेत. सुमारे २ लाख ५० हजार नागरिक बेघर झाले आहेत, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.