Latest

israel hamas war : गाझा रुग्णालयावरील हल्ल्यात 500 ठार, नेतन्याहू म्हणाले-इस्रायलने हल्ला केला नाही

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन : हमासने दावा केला होता की मंगळवारी रात्री उशिरा इस्रायली सैन्याने गाझा पट्टीतील एका रुग्णालयावर रॉकेटने हल्ला केला होता, ज्यामध्ये 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्याचवेळी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी रुग्णालयावरील हल्ला आम्‍ही केला नसल्‍याचे म्‍हटले आहे. गाझातील रूग्‍णालयावरील हल्ला हा दहशतवाद्यांनीच केला असल्याचे त्‍यांनी सांगितले.

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबत नाही आहे. यामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूचे 4500 हून अधिक लोक मारले गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आज तेल अवीव येथे इस्रायलशी एकजूट दाखवण्यासाठी जात आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा हमासने दावा केला की, इस्रायली सैन्याने गाझामधील एका रुग्णालयावर हल्ला केला, ज्यामध्ये आतापर्यंत 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनीही हमासच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन म्हणाले की, गाझामधील रानटी हल्ला इस्रायली लष्कराने नव्हे तर दहशतवाद्यांनी केला हे संपूर्ण जगाला कळले पाहिजे. ज्या लोकांनी आमच्या मुलांना क्रूरपणे मारले, ते स्वतःच्या मुलांनाही मारतात असे ते म्‍हणाले.

यापूर्वी माहिती देताना IDF ने रूग्‍णालयावरील हल्ल्याला इस्लामिक जिहाद जबाबदार असल्याचे म्हटले होते. आयडीएफने म्हटले आहे की, शत्रूने इस्रायलवर अनेक रॉकेट सोडले होते, ज्यापैकी एक अयशस्वी झाले आणि गाझामधील या रुग्णालयावर कोसळले. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या विविध गुप्तचर माहितीनुसार, रूग्‍णालयावरील या रॉकेट हल्ल्याला इस्लामिक जिहाद दहशतवादी संघटना जबाबदार आहे.

मध्य गाझा येथील अल अहली रुग्णालयावर हा हवाई हल्ला झाला. गाझा पट्टीतील शेवटचे ख्रिश्चन रुग्णालय असे त्याचे वर्णन केले जात आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाने दावा केला होता की, इस्रायली सैन्याने मंगळवारी रात्री अल अहली अरेबिक बॅप्टिस्ट हॉस्पिटलवर हवाई हल्ला केला. या रुग्णालयात मोठ्या संख्येने जखमी आणि इतर पॅलेस्टिनी आश्रय घेत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT