Latest

सावधान…! तिरंग्याचा अवमान तर होत नाही ना? गृह विभागाने दिले कारवाईचे आदेश

अमृता चौगुले

संतोष शिंदे

पिंपरी : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तुम्ही जर तिरंगी पेहराव करणार असाल तर जरा काळजी घ्या, कारण शासनाने प्लास्टिकचे तिरंगी झेंडे आणि तिरंगी मास्क वापरण्यावर बंदी घातली आहे. अवधानाने केलेली चूकसुद्धा राष्ट्रध्वजाचा अवमान ठरू शकते, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

…म्हणून प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी
प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांनी खरेदी केलेले कागदी, प्लास्टिकचे राष्ट्रध्वज अनेकदा रस्त्यावर पडल्याचे दिसून येतात. मागील काही दिवसांपूर्वी प्लॅस्टिकचे झेंडे गटारात फाटलेल्या अवस्थेत पडल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. प्लास्टिकचे ध्वज नष्ट होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस राष्ट्रध्वजांची विटंबना होते. या सर्व बाबी विचारात घेत शासनाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घातली आहे.

विक्रेत्यांवरही होणार कारवाई
एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले आहेत. त्यानुसार, केंद्रीय आणि राज्य गृहविभाग, तसेच, शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकदेखील काढले आहे.
शासन निर्णयानुसार राज्यात प्लास्टिक बंदी आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणे कायद्याबाह्य ठरत असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून विक्रेत्यांवरही कारवाई होणार आहे.

तिरंगी मास्कवरही बंदी
तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. त्यामुळे शासन निर्णयानुसार तिरंगी मास्कवरही बंदी घालण्यात आली आहे. दुकानातून, तसेच 'ऑनलाईन' पध्दतीने तिरंग्याच्या रंगातील मास्क खरेदी करणार्‍यांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

जनजागृती करण्याचे आदेश
राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत पोलिसांनी स्थानिक पातळीवर स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी यांच्या मार्फतणे समाजात जनजागृती करावी. तसेच, प्रसार माध्यमांचेदेखील सहकार्य घ्यावे. खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज युवक मंडळे क्रीडा मंडळे, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने गोळा करून त्यांची ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतुदीनुसार कार्यवाही करावी, असे गृह विभागाने काढलेल्या परिपत्रकात नमूद आहे.

या कलमानुसार होईल कारवाई
राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखणे, हे सर्व भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे. जर शासनाने घालून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करून कोणी राष्ट्रध्वजाचा अवमान करीत असल्यास त्याच्यावर राष्ट्रीय प्रतिबंध कायदा 1971 चे कलम 2 अनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

राष्ट्रध्वजाचा उचित मान राखणे, हे सर्वांचे कर्तव्य आहे. शासन निर्णयानुसार प्लास्टिकचे झेंडे, तिरंगी मास्क याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी अशा प्रकारचे बंदी घातलेल्या वस्तू वापरू नयेत.

                                                                         – सतीश माने,
                                                     सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.

SCROLL FOR NEXT