Latest

इस्लामपूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणास 20 वर्षांचा कारावास

backup backup

इस्लामपूर ; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मोईन मोबीन अन्सारी (वय 19, रा. पेठवडगाव, जि. कोल्हापूर) याला न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. चंदगडे यांनी हा निकाल दिला. ही घटना दि. 20 एप्रिल 2019 रोजी घडली होती.

पीडित मुलगी हातकणंगले तालुक्यातील असून घटनेदिवशी ती शिराळा तालुक्यातील मामाच्या गावी सुट्टीला आली होती. ती गावातील यात्रेत गेली होती. त्यावेळी आरोपीने तिला फूस लावून पुण्याला पळवून नेले. तिथे त्याने त्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीतेच्या आईने शिराळा पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायाधीश एस.एम. चंदगडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. शुभांगी पाटील यांनी युक्तीवाद केला. एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. याप्रकरणी आरोपी मोईन अन्सारी याला दोषी धरुन न्यायालयाने बलात्कार व बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत 20 वर्षे सश्रम कारावास व 1000 रु. दंडाची शिक्षा सुनावली. पिडीत मुलगी, तपासी अधिकारी, पंच, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक पी. एस. जाधव, सहाय्यक पोलिस फौजदार चंद्रकांत शितोळे, हवलदार चंद्रकांत कांबळे यांचे सरकारी पक्षाला सहकार्य मिळाले.

SCROLL FOR NEXT