Latest

पुण्यातील जलप्रदूषणाला पाटबंधारे विभागासह पालिकाही जबाबदार : खा. सुप्रिया सुळे

अमृता चौगुले

कात्रज : पुढारी वृत्तसेवा : 'जांभूळवाडी तलावातील जलप्रदूषणामुळे झालेल्या लाखो माशांच्या मृत्यूला पाटबंधारे विभागासह महापालिका प्रशासनही जबाबदार आहे. तलाव परिसरातील अतिक्रमणे, मैलायुक्त पाणी, जलपर्णी आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी दोन्ही प्रशासनांनी संयुक्तपणे उपाययोजना कराव्यात. याबाबत दर पंधरा दिवसांनी आढावा बैठक घेऊन तलावाचे प्रश्न सोडवावेत,' असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

जांभूळवाडी तलावातील जलप्रदूषणामुळे लाखो माशांचा तडफडून मृत्यू झाला. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. तसेच, राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील कात्रत तलावातील जलपर्णीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सुळे यांनी दोन्ही तलावांची पाहणी केली, त्या वेळी त्या बोलत होत्या. माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी नगरसेवक प्रकाश कदम, युवराज बेलदरे, प्रतीक कदम, उपायुक्त माधव जगताप, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, सहायक आयुक्त सुरेखा भणगे, नीलिमा शिंगाडे आदी उपस्थित होते.

युवराज बेलदरे म्हणाले, 'पाटबंधारे विभाग व धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने बोटीच्या साहाय्याने मृत मासे बाहेर काढून विल्हेवाट लावली. मात्र, तलावातील दूषित पाणी ओढ्यात सोडण्यात यावे तसेच तलाव हस्तांतरण प्रक्रिया लवकर पूर्ण करावी.' प्रकाश कदम म्हणाले, 'प्राणिसंग्रहालयातील तलावामधील जलपर्णी काढण्याचे काम 80 टक्के पूर्ण झाल्याने डासांचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तलावातील मैलायुक्त पाणी रोखण्यासाठी एसटीपी प्लँट बसविण्याचे काम लवकर पूर्ण करावे तसेच दूषित पाणी सोडून गाळ काढण्यात यावा.'

जांभूळवाडी तलाव हस्तांतरण प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल. ज्या गृहप्रकल्पांचे मैलायुक्त पाणी तलावात येत आहे, त्यांना नोटिसा देऊन कारवाई केली जाईल तसेच ड्रेनेजलाइनचे कामही लवकर पूर्ण केले जाईल.

                               – माधव जगताप, उपायुक्त, महापालिका

जांभूळवाडी तलाव हस्तांतरणासाठी महापालिकेला पत्र दिले आहे. पाटबंधारे विभागाकडून तलाव क्षेत्र मोजणीसाठी पाठपुरावा केला जात आहे. महापालिकेला तलाव क्षेत्रातून ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी परवानगी दिली आहे.

                          – विजय पाटील, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT