पुढारी ऑनलाईन डेस्क : Glenn Maxwell IPL : आयपीएल ही माझ्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल. जोपर्यंत मी माझ्या पायावर चालू शकतो तोपर्यंत आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने स्पष्ट केले. एका मुलाखतीदरम्यान त्याने आपली भावना व्यक्त केली. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये अधिकाधिक ऑस्ट्रेलियन खेळाडू सहभागी व्हावेत, जेणेकरून ते अगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेची तयारी करू शकतील, अशीही इच्छा त्याने बोलून दाखवली.
मॅक्सवेल हा भारतातून ऑस्ट्रेलियाला परतला असून एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर तो आता बिग बॅश लीगमध्ये (BBL) खेळताना दिसणार आहे. त्या स्पर्धेत तो मेलबर्न स्टार्सचे नेतृत्व करेल. आयपीएलमध्ये सध्या तो विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा भाग आहे.
मॅक्सवेल (Glenn Maxwell IPL) पुढे म्हणाला, 'करिअरच्या शेवटपर्यंत मी आयपीएल खेळत राहीन. माझ्या कारकिर्दीतील ती कदाचित शेवटची स्पर्धा असेल. जोपर्यंत मी चालू शकतो तोपर्यंत मी आयपीएल खेळत राहीन. माझ्या कारकिर्दीत आयपीएलने खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या स्पर्धेत दर्जेदार खेळाडू आणि प्रशिक्षक सहभागी होतात, ज्यांच्याकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळते. या स्पर्धेत तुम्ही दोन महिने एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांसारख्या खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळता, हा कोणाच्याही आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव आहे. मला आशा आहे की या वर्षीच्या आयपीएलमध्ये अधिकाधिक खेळाडू सहभागी होऊन त्यांना टी-20 विश्वचषकाची तयारी करण्यात मदत होईल. सध्या वेस्ट इंडिज येथील परिस्थिती भारतासारखीच आहे. तेथील खेळपट्ट्या या कोरड्या, संथ आहेत ज्याचा फिरकीपटूंना अधिक फायदा मिळू शकतो.'
'वनडे विश्वचषक जिंकल्याचा खूप आनंद आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये मोठे चर्चा सत्र पार पडले, ज्यात आमचे पुढचे लक्ष्य टी-20 विश्वचषक असले पाहिजे यावर एकमत झाले, असाही खुलासा मॅक्सवेलने केला.
मॅक्सवेलला (Glenn Maxwell IPL) डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल जॉन्सन यांच्यात सुरू असलेल्या वादाबद्दलही विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, 'मला या प्रकरणावर प्रतिक्रिया देऊन माझे नाव चर्चेत आणायचे नाही. पण डेव्हिड वॉर्नर नेहमीच चॅम्पियन राहिला आहे. तो बराच काळ ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळला आहे आणि निवडकर्त्यांना माहित आहे की त्यांनी वॉर्नरची निवड का केली आहे. त्याला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळताना पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला आशा आहे की तो या मालिकेत खूप धावा करेल.'
मॅक्सवेल एक दशकाहून अधिक काळ आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने 2012 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्समधून आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. लीगमध्ये त्याने आतापर्यंत खेळलेल्या 124 सामन्यांमध्ये 26.40 च्या सरासरीने आणि 157.62 च्या स्ट्राइक रेटने 2,719 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 18 अर्धशतकेही झळकावली आहेत. लीगमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या 95 आहे. याशिवाय मॅक्सवेलच्या नावावर 73 डावांमध्ये 31 विकेट देखील आहेत.