Latest

Sam Curran : सॅम कुरन IPL चा सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने 18.50 कोटींना घेतले विकत

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी मिनी लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोची येथे सुरू झाला. लिलावात इंग्लंडच्या सॅम कुरनने (Sam Curran) सर्व विक्रम मोडीत काढले. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 2 कोटींची मूळ किंमत असलेल्या सॅम करणला पंजाब किंग्जने 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले. यापूर्वी केएल राहुल (17 कोटी रुपये) हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू होता. लखनौ सुपरजायंट्सने गेल्या वर्षी मसुद्याद्वारे त्याचा संघात समावेश केला होता. 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस (16.25 कोटी रुपये) सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. सॅम पंजाब किंग्जकडून खेळला आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जकडूनही त्याने चमकदार कामगिरी केली आहे.

दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादने इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूकवर पैशांचा वर्षाव करून सर्वांनाच चकित केले. त्याने हॅरी ब्रूकला 13.25 कोटी रुपयांना खरेदी केले. ब्रूकची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये होती. हॅरी ब्रूकबद्दल सांगायचे तर, त्याने इंग्लंडसाठी 26 जानेवारी 2022 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळला. त्याने आतापर्यंत 20 सामन्यांच्या 17 डावात 372 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 81 आहे. ब्रूकची सरासरी 26.57 आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट 137.78 आहे.

सनरायझर्सने मयंकला आठपट जास्त किंमत दिली

सनरायझर्स संघ एवढ्यावरच थांबला नाही. त्यांनी मयंक अग्रवालसाठीही मोठी बोली लावली. मयंकची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. सनरायझर्सने त्याला आठपट जास्त पैसे देऊन आपल्या संघात समाविष्ट केले. सनरायझर्सने मयंकला 8.25 कोटी रुपयांना खरेदी केले. तो संघाचा पुढचा कर्णधार होऊ शकतो.

विल्यमसनवर पहिली बोली

न्यूझीलंडचा दिग्गज आणि सनरायझर्स हैदराबादचा माजी खेळाडू केन विल्यमसनची लिलावात पहिली विक्री झाली. त्याला गुजरात टायटन्सने केवळ 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. गुजरातशिवाय अन्य कोणत्याही संघाने विल्यमसनसाठी बोली लावली नाही. त्याचवेळी अजिंक्य रहाणेला चेन्नई सुपर किंग्जने 50 लाख रुपयांच्या मूळ किंमतीत खरेदी केले.

SCROLL FOR NEXT