Latest

IPL 2024 Playoff : प्लेऑफची लढत रोमांचक, शिल्लक 3 जागांसाठी 7 संघांमध्ये शर्यत, जाणून घ्या समीकरण

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 मधील प्लेऑफची शर्यत खूपच रोमांचक झाली आहे. या हंगामात शनिवारपर्यंत (11 मे) 60 सामने खेळले गेले आहेत. पण केवळ कोलकाता नाईट रायडर्स या संघाने प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. तर मुंबई इंडियन्स (MI) आणि पंजाब किंग्स (PBKS) या दोन संघांना प्लेऑफच्या शर्यतीतून गाशा गुंडाळावा लागला आहे. तसे पाहिले तर लीग टप्प्यातील आता फक्त 10 सामने बाकी आहेत आणि अजूनही 7 संघांनी प्ले ऑफच्या शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवले आहे. अशा स्थितीत कोणत्या संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे याचे समीकरण जाणून घेऊया.

कोलकाता नाईट रायडर्सनंतर राजस्थान रॉयल्स संघ आहे, ज्याचे 16 गुण आहेत. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघ 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सीएसके, दिल्ली, एलएसजी या तीन संघांचे 12-12 गुण आहेत, तर आरसीबी, गुजरात टायटन्स संघांचे 10-10 गुण आहेत.

खरेतर राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज हे उर्वरित तीन स्थानांचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पण दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांनाही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे.

राजस्थान रॉयल्स (RR)

2008 चा चॅम्पियन राजस्थान रॉयल्स सध्या 11 सामन्यांतून 16 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, त्याचे स्थान पूर्णपणे सुरक्षित नाही. रॉयल्सच्या खाली चार संघ आहेत, ज्यांचे 12-12 गुण आहेत. पॉइंट टेबलमध्ये टॉप-2 मध्ये राहण्यासाठी राजस्थान रॉयल्सला शेवटच्या तीनपैकी दोन सामने जिंकावे लागतील.

राजस्थान रॉयल्सचे उर्वरित सामने :
12 मे : विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दुपारी 3:30 वा
15 मे: पंजाब किंग्स विरुद्ध, संध्याकाळी 7:30 वा
19 मे: विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी 7:30 वा

सनरायझर्स हैदराबाद (SRH) :

सनरायझर्स हैदराबादचे 12 सामन्यांत 14 गुण आहेत. त्यांनी एलएसजीवरच्या विजयाने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. एसआरएचचा नेट-रन रेट देखील प्लसमध्ये आहे (+0.406). त्यांचा गुजरात टायटन्सविरुद्धचा पुढील सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सामना त्यांनी जिंकल्यास त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित होऊ शकतो.

सनरायझर्स हैदराबादचे उर्वरित सामने :
16 मे: विरुद्ध गुजरात टायटन्स, संध्याकाळी 7:30 वा
19 मे: पंजाब किंग्स विरुद्ध, दुपारी 3:30 वा

चेन्नई सुपर किंग्स (CSK)

गतविजेता सीएसके (+0.491) गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. ऋतुराज गायकवाडचा संघ रविवारी घरच्या मैदानावर राजस्थानचा सामना करेल आणि 18 मे रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळेल. हे दोन्ही सामने जिंकल्यास त्यांचे 16 गुण होतील. असे झाल्यास, डीसी आणि एलएसजीच्या तुलनेत उत्तम रन रेटमुळे चेन्नई आपसूकच प्लेऑफसाठी पात्र ठरेल. अशातच त्यांनी एक जरी सामना गमावला तरीही त्यांचे भवितव्य दिल्ली आणि लखनौ यांच्यातील सामन्यात पराभव होणा-या संघावरून ठरेल. पण चेन्नईने त्यांचे दोन्ही सामने गमावल्यास ते स्पर्धेतून बाहेर पडतील. कारण त्यांचे 12 गुण राहतील आणि एलएसजी आणि डीसीमधील विजेत्या संघा गुण 14 गुण होतील.

सीएसकेचे उर्वरित सामने :
12 मे : विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुपारी 3:30 वा.
18 मे : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध, संध्याकाळी 7:30 वा.

दिल्ली कॅपिटल्स (DC)

ऋषभ पंतची दिल्ली कॅपिटल्स सध्या 12 गुणांसह (-0.316) पाचव्या स्थानावर आहे. त्यांचे उर्वरित दोन सामने आरसीबी आणि एलएसजी विरुद्ध होणार आहेत. हे दोन्ही सामने जिंकून डीसी 16 गुणांच्या जोरावर प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. त्यातच त्यांना सीएसकेने त्यांच्या दोन पैकी एका सामन्यात पराभव पत्करावा लागेल यासाठी प्रार्थना करावी लागेल. जर सीएसके आणि दिल्लीचे 16-16 गुण झाले तर नेट रन रेटवर निकाल लागेल. जर दिल्लीने दोनपैकी एक सामना जिंकला आणि त्यांच्या खात्यात 14 गुण जमा झाल्यास सीएसकेने त्यांचे दोन्ही सामने गमावले पाहिजेत. तर लखनौने किमान एक सामना गमावणे आवश्यक असेल. शेवटी, जर कॅपिटल्सने त्यांचे दोन्ही सामने गमावले तर ते बाद होतील आणि लखनौ त्यांना मागे टाकेल.

डीसीचे उर्वरित सामने :

12 मे : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध, संध्याकाळी 7:30 वा.
14 मे : विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, संध्याकाळी 7:30 वा.

लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) :

लखनौ सुपर जायंट्सचे 12 सामन्यांत 12 गुण आहेत. केएल राहुलच्या संघाला उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्यांचे पुढील सामने दिल्ली आणि मुंबई विरुद्ध आहेत. या दोन सामन्यातील विजयासह त्यांना सनरायझर्स हैदराबाद किंवा चेन्नई सुपर किंग्ज याच्या एका पराभवावर अवलंबून रहावे लागेल.

लखनौ सुपर जायंट्सचे उर्वरित सामने :
14 मे : विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी 7:30 वा.
17 मे : विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी 7:30 वा.

7. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) :

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जविरुद्ध नेत्रदीपक विजय मिळवून गुणतालिकेत मोठी झेप घेतली. आता आरसीबी 10 गुणांसह 7व्या स्थानावर आहे. आरबीआयला आता दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळायचे आहे. आरसीबीला हे दोन्ही सामने जिंकावे लागतील. तसेच, त्यांना सीएसकेने राजस्थान रॉयल्सविरुद्धचा आणि लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना गमवावा यासाठी प्रार्थना करावी लागेल. तरच आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरू शकेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे उर्वरित सामने :
12 मे : विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी 7:30 वा.
18 मे : विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी 7:30 वा.

गुजरात टायटन्स (GT) :

गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या विजयाने आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र, त्यांची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता फारच कमी आहे. गुजरातने आपले उर्वरित दोन सामने जिंकल्यास ते 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. अशा स्थितीत गुजरातला गुणतालिकेत वरच्या क्रमांकावर असलेल्या संघांच्या सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

गुजरात टायटन्सचे उर्वरित सामने :
13 मे : विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी 7:30 वा.
16 मे : विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7:30 वा.

SCROLL FOR NEXT