पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार श्रेयस अय्यरला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मंगळवारी कोलकाता येथे झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत आयपीएलने बुधवारी निवेदन प्रसिद्ध केले.
आयपीएलच्या (IPL 2024) अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोलकाता संघाची या हंगामातील ही पहिली चूक आहे, त्यामुळे आयपीएलच्या आचारसंहितेनुसार किमान शिक्षा देण्यात आली आहे.
ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने 20 षटकांत 6 बाद 223 धावा केल्या. सुनील नरेनने 56 चेंडूत 109 धावा केल्या. राजस्थानने 20 षटके खेळून 8 विकेट गमावून 224 धावा केल्या. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने (नाबाद 107 धावा) शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करत आपल्या संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. दरम्यान या पराभवाबरोबर केकेआरला दुहेरी झटका बसला. त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यरला स्लो ओव्हर-रेटबद्दल बारा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
केकेआरला हा सामना सहज जिंकता आला असता, पण एकट्या जोस बटलरने सामन्याला कलाटणी दिली. ज्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरला या मोसमातील दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. याबरोबरच केकेआर सहा सामन्यांतून चार विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर आरआरने सात सामन्यांत सहाव्या विजयानंतर अव्वल स्थानावर आपली आघाडी मजबूत केली आहे.