Latest

IPL 2023 : आयपीएल प्ले-ऑफमध्ये रंगणार दोन जुन्या-नव्या दावेदारांची तुफान ‘फाईट’

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या यंदाच्या सिझनमध्ये बरेच थरारक सामने पाहायला मिळाले. रविवारच्या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीला पराभूत केल्याने मुंबई इंडियन्स आता चौथ्या क्रमांकावर विराजमान झाली आहे. त्यांना प्ले-ऑफचे तिकीट मिळाले आहे. चार तगडे संघ प्ले-ऑफमध्ये आल्यामुळे सामने अटीतटीचे होणार यात शंका नाही. त्यामुळे आता प्ले-ऑफचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक उत्साहीत आहेत.

मागील वर्षी प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी होऊन थेट विजेतेपदाला गवसणी घातलेल्या गुजरात टायटन्सने यावेळी देखील आपली तीच कामगिरी करून दाखवली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळताना गुजरातने 10 सामन्यांचा विजय नोंदवत पहिले स्थान काबीज केले. त्यानंतर एम.एस. धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने मागील वर्षीचे अपयश विसरत, 17 गुणांसह दुसरे स्थान पटकावत क्वालिफायर-1 मध्ये आपली जागा बनवली. आता गुजरात आणि चेन्नई या दोन संघांत मंगळवारी (23 मे) चेन्नई येथील चेपॉक मैदानावर क्वालिफायर-1 सामना खेळला जाईल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल.

गुजरातप्रमाणेच गेल्यावर्षी आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या लखनौने आपल्या कामगिरीत सातत्य दाखवले. त्यांनी 17 गुणांसह साखळी फेरी तिसर्‍या स्थानी संपवली. कर्णधार के.एल. राहुल हंगामाच्या अर्ध्यातून दुखापतग्रस्त होऊन बाहेर झाल्यानंतर कृणाल पंड्याने यशस्वीरीत्या संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेत संघाला सलग दुसर्‍यांदा प्ले-ऑफसाठी पात्र ठरला. अखेरच्या सामन्यात आरसीबी पराभूत झाल्याने मुंबईला ही संधी मिळाली. लखनौ आणि मुंबई यांच्यात बुधवारी (24 मे) एलिमिनेटर सामना होईल. हा सामनाही चेन्नई येथे खेळला जाईल.

या सामन्यात पराभूत झालेला संघ थेट बाहेर पडेल. तर विजेत्या संघाला पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झालेल्या संघाशी क्वालिफायर-2 चा सामना खेळता येईल. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर 26 मे रोजी होईल. तसेच आयपीएलचा अंतिम सामना याच मैदानावर 28 मे रोजी खेळला जाईल.

विजेता संघ होणार मालामाल (IPL 2023)

आयपीएल 2023 ची लीग फेरी आता संपली आहे. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यानंतर प्ले-ऑफसाठी संघ निश्चित झाले आहेत. जेतेपद कोणाच्या नावावर होणार हे ठरलेले नाही, पण हा चॅम्पियन जो असेल, तो संघ मालामाल होणार हे मात्र नक्की आहे. क्रिकेटमधील सर्व टी-20 लीगमध्ये आयपीएलची बक्षीस रक्कम सर्वाधिक आहे.

आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावणार्‍या संघाला 20 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. अंतिम फेरीत पराभूत होणारा संघही रिकाम्या हाताने जाणार नाही. त्याला 13 कोटी रुपयेही दिले जाणार आहेत. त्याच वेळी प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवणार्‍या इतर दोन संघांना 7-7 कोटी रुपये मिळतील.

आयपीएलचा पहिला सिझन 2008 मध्ये झाला होता. त्या वर्षी 8 संघांनी विजेतेपदासाठी स्पर्धा केली होती आणि राजस्थान रॉयल्स चॅम्पियन म्हणून उदयास आला. त्या वर्षी राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन बनण्यासाठी बक्षीस फेरीत 4 कोटी 80 लाख रुपये देण्यात आले होते. याशिवाय अंतिम फेरीत राजस्थानकडून पराभूत झालेल्या चेन्नई सुपर किंग्जला उपविजेते म्हणून 2.4 कोटी रुपये देण्यात आले होते. 2008 पासून आयपीएलच्या बक्षीस रकमेत पाच पटीने वाढ झाली आहे.

आयपीएलमध्ये केवळ चॅम्पियन बनणार्‍या संघालाच नाही तर खेळाडूंनाही अनेक पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी पारितोषिक रक्कमही दिली जाते.

ऑरेंज कॅप – रु. 15 लाख
पर्पल कॅप – रु. 15 लाख
सर्वाधिक षटकार – रु. 12 लाख
सुपर स्ट्रायकर – रु. 15 लाख

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT