Latest

RCB vs GT : आरसीबीसाठी खलनायक ठरणार पाऊस?

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : RCB vs GT : आयपीएलचा 70 वा सामना रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार आहे. लीग टप्प्यातील हा शेवटचा सामना असून बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून दोन्ही संघ एकमेकांना भिडणार आहेत. गुजरात संघाने याधीच प्लेऑफमध्ये जागा निश्चित केली आहे, तर बेंगलोरला त्यांचा शेवटचा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून त्यांना पुढील टप्प्यात प्रवेश करता येईल. मात्र, आरसीबीसाठी पाऊस खलनायक ठरू शकतो. सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. सामन्याच्या वेळी हवामान कसे असेल ते जाणून घेऊया.

वेदर डॉट कॉमच्या (Weather.com) माहितीनुसार, आरसीबी विरुद्ध जीटी यांच्यातील सामन्यात पावसाची 60 टक्क्यांहून अधिक शक्यता आहे. सामन्याच्या नियोजित वेळेत पावसाची 70 टक्के शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन तासांत पावसाची 58 ते 63 टक्के शक्यता आहे. सामन्यादरम्यान तापमान सुमारे 23°C ते 26°C पर्यंत असू शकते. आर्द्रता अंदाजे 69 टक्के ते 86 टक्के असेल. ताशी 9 किलोमीटर वेगाने वारा वाहू शकतो. (RCB vs GT)

विशेष म्हणजे, तीन प्लेऑफ स्लॉट भरले गेले आहेत. जीटी व्यतिरिक्त, चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) हे संघ पात्र ठरले आहेत. बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात अंतिम जागेसाठी लढत होत आहे. दोघांचे सध्या 14-14 गुण आहेत. पण चांगल्या नेट-रनरेटमुळे आरसीबी चौथ्या आणि मुंबई सहाव्या स्थानावर आहे. आज दुपारी 3.30 वाजता मुंबईचा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRA) विरुद्ध होणार आहे. मुंबई आणि आरसीबीने आपापले सामने जिंकल्यास त्यांचे गुण समान होतील, पण नेट-रननेटच्या आधारे निर्णय घेतला जाईल. पण जर एमआय जिंकली आणि आरसीबीचा सामना पावसाने रद्द झाला तर मात्र मुंबईचा संघ पात्र ठरेल कारण त्यांचे 16 गुण होतील आणि आरसीबीला 15 गुणांवर समाधान मानावे लागेल. (RCB vs GT)

SCROLL FOR NEXT