Latest

Ravindra Jadeja Record : रवींद्र जडेजाचा मोठा पराक्रम! IPL मध्ये रचला ‘हा’ विक्रम

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध एक मोठी कामगिरी केली. तो आयपीएलच्या इतिहासात 150 बळी घेणारा पहिला डावखुरा गोलंदाज ठरला असून त्याच्यानंतर या यादीत दिल्ली कॅपिटल्सचा डावखुरा गोलंदाज अक्षर पटेल आहे, ज्याच्या खात्यात 112 विकेट जमा आहेत.

जडेजाने गुजरातचा फलंदाज दासून शनाकाची विकेट घेत आयपीएलमध्ये 150 बळींचा टप्पा गाठला. यासह, तो आयपीएलमध्ये 1000 हून अधिक धावा आणि 150 बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. शनाकापाठोपाठ जडेजाने डेव्हिड मिलरलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले, त्यामुळे गुजरातचा संघ दबावाखाली आला. जडेजाने 4 षटकात 18 धावा देत 2 बळी घेतले. (Ravindra Jadeja Record)

जडेजा अष्टपैलू खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये 150 विकेट आणि सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. त्याने आयपीएलमध्ये 225 सामन्यांमध्ये 2677 धावा केल्या आहेत आणि 151 विकेट घेतल्या आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ड्वेन ब्राव्हो आहे, ज्याने 1560 धावा केल्या आहेत. सुनील नरेन 1045 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आयपीएलमध्ये 'या' डावखुऱ्या गोलंदाजांनी घेतल्या सर्वाधिक विकेट्स (Ravindra Jadeja Record)

रवींद्र जडेजा : 150
अक्षर पटेल : 112
आशिष नेहरा : 106
ट्रेंट बोल्ट : 105
झहीर खान : 102

सीएसकेने मंगळवारी पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. चेन्नईने गुजरातसमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले, त्याला प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 20 षटकांत सर्वबाद 157 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या विजयासह चेन्नईने विक्रमी 10व्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ते 28 मे रोजी पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उतरतील. दरम्यान, गुजरातला दुसरा क्वालिफायर खेळण्याची संधी आहे. एलिमिनेटरमधील लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स याच्यातील विजेत्या संघाशी गुजरातचा सामना होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT