मुंबई; वृत्तसंस्था : क्विंटन डीकॉक (नाबाद 140) व केएल राहुल (नाबाद 68) यांनी दिलेल्या 210 धावांच्या अभेद्य सलामीनंतर गोलंदाजांच्या उपयुक्त मार्याच्या बळावर लखनौ सुपर जायंट्सने केकेआरवर अवघ्या 2 धावांनी निसटता विजय मिळविला. याबरोबरच लखनौने आयपीएल 2022 च्या गुणतक्त्यात 18 गुणांसह दुसर्या स्थानावर झेप घेत प्ले ऑफमधील स्थान सुरक्षित केले. शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करूनही पराभव स्वीकारावा लागल्याने केकेआरचे आव्हान संपुष्टात आले.
विजयासाठी 211 धावांचे टार्गेट नजरेसमोर ठेवून केकेआरने 20 षटकांत 8 बाद 208 धावा काढल्या. वेंकटेश अय्यर आणि अभिजित तोमर यांनी केकेआरच्या डावास सुरुवात केली. मात्र, मोहसीन खानने अय्यरला शून्यावर डीकॉककरवी झेलबाद केले. त्यानंतर मोहसीनने दुसरा धक्का देताना तोमरला (4) राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले. यामुळे केकेआरची 2 बाद 9 अशी स्थिती झाली. मात्र, त्यानंतर नितिश राणा व श्रेयस अय्यर यांनी आक्रमक फटकेबाजी करत सहाव्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले. तर तिसर्या विकेटसाठी 18 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.
राणा व अय्यर जोडी जमली असे वाटत असतानाच कृष्णाप्पा गौतमने राणाला स्टॉयनिसकरवी झेलबाद केले. राणाने 22 चेंडूंत 42 धावा काढल्या. त्यानंतर श्रेयस व सॅम बिलिंग्स या जोडीने चौथ्या विकेटसाठी 24 चेडूत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. तर स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर दुहेरी धाव घेत श्रेयशने 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मात्र पुढच्याच चेंडूवर हुडाने सीमारेषेवर झेल घेत श्रेयसचा (50) अडथळा दूर केला.
शेवटच्या पाच षटकांत केकेआरला 77 धावांची गरज होती. रसेल व सॅम खेळपट्टीवर होते. मात्र, सॅम (36) अडथळला बिष्णोईने दूर केला. पाठोपाठ मोहसिनने रसेलचा (5) मोठा अडथळा दूर केला. मात्र, सुनील नारायण व रिंकू सिंग यांनी प्रतिकार सुरुच ठेवला. शेवटच्या षटकात केकेआरला 21 धावांची गरज होती. या षटकात रिंकू सिंगने पहिल्या चार चेंडूत 18 धावा काढल्या. पण पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. त्याने 15 चेंडूत 2 चौकार व 4 षटकारांसह 40 धावा काढल्या. शेवटच्या चेंडूवर स्टॉयनिसने उमेश यादवला शून्यावर त्रिफळाबाद करून लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सुनील नारायण 21 धावांवर नाबाद राहिला. लखनौच्या वतीने मोहसिन खान व मार्कस स्टॉयनिसने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत बिनबाद 210 धावा जमविल्या. कर्णधार केएल राहुल व क्विंटन डीकॉक या जोडीने लखनौला शानदार सुरुवात करून देताना आठव्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले. दहाव्या षटकाअखेर या जोडीने 83 धावांची सलामी दिली. डीकॉकने वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत आपले अर्धशतक 36 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने पूर्ण केले. 13 व्या षटकात या जोडीने शतकी भागीदारी पूर्ण केली. पाठोपाठ कर्णधार राहुलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 41 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने पन्नास धावा पूर्ण केल्या.
डीकॉकने आपले अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर आक्रमक फटकेबाजीस सुरुवात केली. डीकॉकने आंद्रे रसेलला खणखणीत चौकार ठोकून आयपीएलमधील दुसरे शतक पूर्ण केले. त्याने अवघ्या 59 चेंडूंत 6 चौकार व 7 उत्तुंग षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. त्याने पहिले शतक 2016 मध्ये आरसीबीविरुद्ध झळकावले होते. टिम साऊथीने टाकलेल्या 19 व्या षटकात डीकॉकने चार षटकार खेचत तब्बल 27 धावा कुटल्या. तर शेवटच्या षटकात डीकॉकने रसेलच्या गोलंदाजीवर 4 चौकारांसह 19 धावा काढल्या. यामुळे लखनौने 20 षटकांत बिनबाद 210 धावांचा डोंगर उभा केला.
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपर जायंट्स : 20 षटकांत बिनबाद 210 धावा, डीकॉक नाबाद 140, राहुल नाबाद 68 धावा.
कोलकाता नाईट रायडर्स : 20 षटकांत 8 बाद 208, अय्यर 50, राणा 42, रिंकू सिंग 40, स्टॉयनिस व मोहसिन खान प्रत्येकी 3 विकेटस्.