Latest

IPL 2022: दिल्लीचे बल्ले बल्ले! कोलकाताला ४ गडी राखून धूळ चारली

backup backup

मुंबई वृत्तसंस्था :

रोव्हमन पॉवेलने उत्तुंग षटकार खेचला आणि विजयासाठी ठेवलेले 147 धावांचे लक्ष्य आरामात पार करून ऋषभ पंतच्या दिल्लीने गुरुवारी कोलकाताला 4 गडी राखून धूळ चारली. या विजयाबरोबर दिल्लीने आठ सामन्यांतून आपली गुणसंख्या आठवर नेली आहे. दुसरीकडे कोलकाताचे नऊ सामन्यांतून अवघे सहा गुण झाले असून त्यांची आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. कुलदीप यादवने दिल्लीकडून अवघ्या 14 धावांत 4 बळी मिळवले व तोच विजयाचा शिल्पकार ठरला.

दिल्लीची सुरुवातीलाच पडझड झाली. सामन्यातील पहिल्याच चेंडूवर सलामीवीर पृथ्वी शॉ बाद झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने 26 चेंडूंत 42 धावा कुटल्या त्या आठ चौकारांसह. कोव्हिडमधून बरा झालेला मिशेल मार्श फार टिकला नाही. 13 धावा करून त्याने तंबूचा रस्ता धरला. पाठोपाठ 22 धावांची आकर्षक खेळी करून अष्टपैलू ललित यादव बाद झाला. आता सारी मदार कर्णधार ऋषभ पंतवर होती. मात्र, उमेश यादवने त्याला केवळ दोन धावांवर टिपले.

84 धावांवर दिल्लीचा निम्मा संघ तंबूत परतला. रोव्हमन पॉवेल आणि अक्षर पटेल यांनी हळूहळू जम बसवला आणि संधी मिळेल तेव्हा टोलेबाजी केली. मात्र, एक चोरटी धाव घेण्याच्या नादात अक्षर बाद झाला. त्याने 24 धावांची झटपट खेळी केली. 15 षटकांनंतर दिल्लीने 6 बाद 113 धावा केल्या होत्या. आता शार्दूल ठाकूर मैदानात उतरला. दिल्लीला तेव्हा 30 चेंडूंत 34 धावांची गरज होती. मग पॉवेल (33 धावा 16 चेंडू 1 चौकार व 3 षटकार) आणि ठाकूर (8) यांनी संयमी खेळ्या करून दिल्लीला विजय मिळवून दिला. कोलकाताकडून उमेश यादवने 24 धावा देऊन 3 मोहरे टिपले. कर्णधार श्रेयस अय्यरने स्वतःसह आठ गोलंदाज वापरले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

त्यापूर्वी पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या कोलकाताची कुलदीप यादवच्या धारदार मार्‍यापुढे भंबेरी उडाली. कर्णधार श्रेयस अय्यर आणि नितीश राणा यांनी धीरोदात्त खेळ्या केल्यामुळेच कोलकाताला 9 बाद 146 अशी बर्‍यापैकी धावसंख्या उभारता आली. सलामीवीर एरॉन फिंच आणि व्यंकटेश अय्यर यांचे खराब प्रदर्शन सुरूच आहे. फिंचने 3 तर व्यंकटेशने 6 धावा केल्या. हे दोघे तंबूत परतले तेव्हा फलकावर 22 धावा लागल्या होत्या. फिंचला चेतन साकरियाने आणि व्यंकटेशला अक्षर पटेलच्या फिरकीने चकवले. त्यानंतर कुलदीपचा धमाका सुरू झाला. कोलकाताकडून कर्णधार श्रेयस अय्यरने 37 चेंडूंत 42 धावा करून ही पडझड रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोदेखील कुलदीपची शिकार ठरला.

बाबा इंद्रजित याला 6 धावांवर कुलदीपने टिपले. त्यानंतर कुलदीपने सुनील नारायण आणि आंद्रे रसेल यांना भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळे कोलकाताचे सहा फलंदाज शंभरीचा टप्पा गाठण्यापूर्वीच तंबूत परतले. नितीश राणाने एक बाजू लावून धरली व सोळाव्या षटकात संघाला शंभरीचा टप्पा गाठून दिला.तोपर्यंत कोलकाताची धावगती प्रतिषटक सहाच्या आसपासच तरंगत होती. नितीश राणाने 57 धावांची खेळी केल्यामुळे कोलकाताच्या धावसंख्येला काहीसा आकार आला. त्याने 34 चेंडूंचा सामना करून 3 चौकार आणि 4 षटकार हाणले. रिंकू सिंगने झटपट 23 धावा केल्या. त्यात 3 चौकारांचा समावेश होता. दिल्लीकडून कुलदीप यादवने 14 धावांत 4, मुस्तफिजुर रहमानने 14 धावांत 3 तर अक्षर पटेल आणि चेतन साकरिया यांनी प्रत्येकी 1 गडी टिपला. दिल्लीच्या सर्वच गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. त्यांनी कोलकाताच्या फलंदाजांना जखडून ठेवले होते.

SCROLL FOR NEXT