Latest

सांगली : राब-राब राबून मिळवलं जगण्याचं बळ; मंडईत, बाजारात महिलाराज

दिनेश चोरगे

सांगली : सगळ्याच भाजी मंडईत आणि बाजारात महिला वर्गाचे वर्चस्व आहे. सांगली-कुपवाडमध्ये आठवड्याला 35 आठवडी बाजार वेगवेगळ्या ठिकाणी भरतात. भाजीपाला संपेपर्यंत महिला बाजार सोडत नाहीत. रोज रात्री 11 वाजता घरी जाणार्‍या महिला आहेत.

आटपाडी तालुक्यातील लक्ष्मी (नाव बदलले) यांचे अल्पवयातच आई-वडिलांनी लग्न करून दिले. ती सांगलीत आली. चार मुली आणि एक मुलगा. तिला शिक्षणाची आवड असूनही शिकू शकली नाही. केळी विकून संसार चालविते. चारही मुलींना चांगले शिक्षण देण्याचे आव्हान तिने स्वीकारले. ती म्हणते, प्रत्येक स्त्रीने शिकले पाहिजे, घराबाहेर पडले पाहिजे, तरच जगरहाटी कळते. घरातच बसले तर जग कळत नाही आणि घरातले आणि बाहेरचे तुला काय कळते, असं म्हणत राहतात.

27 वर्षे भाजीपाला विक्री करणार्‍या लता कांबळे म्हणाल्या, दुपारी 3.30 ते रात्री 11 वाजेपर्यंत आठवडी बाजारात भाजी विकते. इतक्या वर्षात काहीही बदल झाला नाही. पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची सोय बाजारात नसते. त्यामुळे पंचाईत होते. एका बाजारात 800 ते 1000 भाजीविक्री करणार्‍या महिला असतात. तिथं राहणार्‍या लोकांची आम्ही मदत घेतो. परिस्थितीमुळे भाजीविक्री करावी लागते. त्यातूनच मुलांचं शिक्षण, लग्नं पार पडली. आता भाजी विकायची सवय लागली आहे. त्यामुळे रोज बाजारात गेल्याशिवाय आणि काम केल्याशिवाय करमत नाही. कर्जे काढली आहेत, त्यासाठी पैसे मिळवायचे आणि भरायचे. तोपर्यंत दुसरी जबाबदारी उभी असते.
नवरा दारू पिऊन मारझोड करतो, म्हणून घरातून बाहेर पडलेल्या सविताला भाजी व्यवसायानं तारलं. ती म्हणाली, काम करून पोट भरण्याशिवाय पर्याय नव्हता. माहेरी परत जायचं, तर सांभाळणार कोण? भाजीपाला विकतो. चार पैसे मिळतात. दोन पोरांना शाळेत घातलंय. त्यांना शिकवायचे ठरवलेय. काही झालं तरी त्यांना दारूपासून दूर ठेवण्यासाठी राबणार. बापासारखं होऊ देणार नाही. रस्त्यावर बसून भाजी विकतोय.पण याच्याचमुळं माझ्याडोक्यावर छप्पर हाय. मुलं मला मदत करत्यात, म्हणून जगतोय.रडत बसलो असतो तर काहीच झालं नसतं.

60 टक्के विक्रेत्या महिला

कधी अपघाताने, तर कधी नवरा नसलेल्या, परित्यक्ता, देवदासी, दारूडा नवरा असलेल्या महिलांना संसाराचा गाडा ओढण्यासाठी भाजी विक्री करून जीवनचरितार्थ चालवावा लागतो. 3500 भाजी विक्रेते नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 60 टक्के महिला आहेत.

रोजचा प्रवास…

पहाटे 5.30 वाजता सुरुवात
घरातील कामाचे नियोजन
भाजी संकलन करून बाजारात जाणे
रात्री उशिरापर्यंत भाजीविक्री करणे
मिळेल त्या वाहनाने घरी जाणे
दुसर्‍या दिवशीच्या बाजाराची तयारी
एकही दिवस सुट्टी नाही

आर्थिक संकटांना घाबरून पुरुष आत्महत्या करतात, परंतु महिला न डगमगता मुला-बाळांसाठी कणखरपणाने उभ्या राहतात. भाजी विक्रेत्या महिलांपुढे रोज नवे प्रश्न उभे राहतात. परंतु त्या भाजीविक्री करत येईल त्या संकटाला तोंड देतात. नफा-तोटा, नुकसानीला त्या घाबरत नाहीत.
– शंभुराज काटकर अध्यक्ष, जनसेवा भाजीपाला संघटना

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT