पक्षांतर्गत निवडणुकीमुळे काँग्रेस पक्ष मजबूत होईल : शशी थरूर
backup backup
वर्धा, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत निवडणुका झाल्याने काँग्रेस पक्ष मजबूत होईल. यामुळे सामान्य जनतेमध्ये योग्य संदेश जाईल, असे मत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांनी व्यक्त केले.
शशी थरूर आज सेवाग्राम येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आले होते. वर्धा येथे चिंतामणी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयात पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
या वेळी थरूर म्हणाले की, "आजपासून माझ्या प्रचाराला सुरुवात करीत आहे. प्रत्येक राज्यामध्ये जाऊन काँग्रेस प्रतिनिधींच्या भेटी घेणार आहे.. भाजपला २०१९ मध्ये फक्त ३७ टक्के मतदान झाले होते. आजही त्यांच्या विरोधात जनमानस आहेत. काँग्रेस पक्ष इतर पक्षाशी मिळून सामान्य जनतेचा विश्वास संपादन करणार आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेला दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद दिसत आहे. लोक त्यांना समर्थन द्यायला येत आहेत. तसेच शशी थरूर यांनी काँग्रेस पक्ष सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल."
२०२४ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला किती जागा मिळेल याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला नाही. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे आशिष देशमुख, राजेंद्र शर्मा व इक्राम हुसेन उपस्थित होते. पक्षामध्ये बदल घडवून आणण्यासाठी अध्यक्षपदाचा उमेदवार असल्याचे त्यांनी सागितले. राहुल गांधी यांच्या पदयात्रेतून नवीन उर्जा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.