Latest

INS Vs WI 1st Test : टीम इंडियाचा नवा अध्याय; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना आजपासून

मोहन कारंडे

डॉमिनिका; वृत्तसंस्था : आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या सलग दोन सत्रांत उपविजेतेपदावर समाधान मानलेला भारतीय संघ आता टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2024-25 च्या सत्राला सुरुवात करीत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध डॉमिनिका येथे बुधवारपासून सुरू होणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात युवा खेळाडूंची कसोटी लागणार आहे. या सामन्यात यशस्वी जैस्वालचे आंतरराष्ट्रीय पदार्पण नक्की मानले जात आहे.

भारतीय संघ संक्रमणातून जात असून त्यांनी 2024-25 च्या कसोटी चॅम्पियनशिपची तयारी सुरू केली आहे. निवड समितीने चेतेश्वर पुजारासारख्या अनुभवी खेळाडूला संघाबाहेर करून युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यशस्वी जैस्वालने आयपीएल आणि प्रथम श्रेणी सामन्यात केलेली कामगिरी लक्षात घेऊन त्याला राष्ट्रीय संघाची दारे उघडण्यात आली आहेत. तो रोहित शर्मासोबत सलामीला खेळण्याची शक्यता असून शुभमन गिल तिसर्‍या क्रमांकावर खेळेल.

दुसरीकडे गोलंदाजीतही युवा खेळाडूंचा भरणा आहे. मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे, तर उमेश यादवला वगळण्यात आले आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे दीर्घकाळ संघाबाहेर आहे. अशा स्थितीत भारताकडे मोहम्मद सिराज हा एकमेव अनुभवी वेगवान गोलंदाज उरतो आहे. जयदेव उनाडकट हा वयाने मोठा असला तरी त्याच्या नावापुढे जास्त सामन्याचा अनुभव नाही; तर पश्चिम बंगालचा मुकेश कुमार हा नवोदित गोलंदाज पदार्पण करण्याची शक्यता आहे.

फिरकी गोलंदाजीत मात्र भारताकडे अनुभवी गोलंदाजांचा संच आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला मुकलेला रविचंद्रन अश्विन आपली उपयुक्तता दाखवण्यास सज्ज आहे. त्याच्या जोडीला रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान राखून आहे. इशान किशन की कोना भरत यापैकी यष्टीरक्षक कोण असेल याचा निर्णय रोहित शर्माने आधीच घेतला असेल.

पहिला कसोटी सामना
स्थळ : विंडसर पार्क, डॉमिनिका
वेळ : सायं. 7.30 वा. पासून
थेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्टस्
लाईव्ह स्ट्रिमिंग : फॅन कोड अ‍ॅप, जिओ सिनेमा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT