Latest

माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राहणारी ‘ती’मैत्रीण कोण?: अमरिंदर सिंग यांची चौकशी होणार

अमृता चौगुले

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची पाकिस्तानी मैत्रीण अरुसा आलम हिच्यामुळे अडचणीत आले आहेत. सिंग मुख्यमंत्री असताना शासकीय निवासस्थानी साडेचार वर्षे राहिल्याने त्या प्रकरणाची आता चौकशी करण्यात येणार आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसने आता कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी खुले युद्ध पुकारले आहे. अमरिंदर यांची पाकिस्तानी पत्रकार मैत्रीण अरुसा आलम यांनाही राज्यातील काँग्रेस सरकारने चौकशीच्या घेर्‍यात घेतले आहे. अरुसा आलम यांच्या 'आयएसआय' कनेक्शनची चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांनी शुक्रवारी सांगितले.

पोलीस महासंचालक इकबालप्रीत सहोता यांना तसे निर्देशही देण्यात आले आहेत. अरुसा यांच्याविषयी आतापर्यंतच्या प्राथमिक चौकशीदरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या आहेत, त्यांची सखोल चौकशी राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक आहे, असेही उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग यांनी सांगितले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना मी माझ्यानंतरचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही; कारण सिद्धू हे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान तसेच लष्करप्रमुख कमर बाजवा यांचे मित्र आहेत. सिद्धू मुख्यमंत्री झाल्यास पंजाबसह देशाच्या सुरक्षिततेला धोका आहे, असे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पदावरून पायउतार झाल्यानंतर स्पष्ट केले होते. त्यावर बोट ठेवून रंधावा म्हणाले की, अमरिंदर मुख्यमंत्री असताना त्यांच्या शासकीय निवासस्थानी पाकिस्तानी पत्रकार अरुसा आलम मुक्‍कामी राहत असे. तेव्हा पाकिस्तान वा 'आयएसआय'कडून पंजाबला धोका नव्हता काय? अमरिंदर यांनी रंधावा यांच्या वक्‍तव्यावर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

'त्या' बॉम्बस्फोटाची नव्याने चौकशी

रंधावा यांनी मौड बाजारात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणातही अमरिंदर यांच्यावर बोट ठेवले आहे. काँग्रेस नेते हरमिंदरसिंग जस्सी यांच्या सभेत हा स्फोट झाला होता, त्यात 9 लोक मरण पावले होते. बॉम्बस्फोट कुणी करविला, ते मात्र अद्यापही समोर आलेले नाही. रंधावा म्हणाले, पंजाब सरकार या घटनेची नव्याने चौकशी करणार आहे.

SCROLL FOR NEXT