पुढारी ऑनलाईन डेस्क : बायकोला मूल होत नाही हे हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोटाचे कारण ठरू शकत नाही, असा महत्त्वाचा निकाल पाटणा उच्च न्यायालयाने दिला आहे. सोनू कुमार विरुद्ध रिना देवी या खटल्यात न्यायमूर्ती जितेंद्र कुमार आणि पी. बी. बजांथ्री यांनी हा निकाल दिला आहे. हिंदू विवाह कायद्यात वंध्यत्वमुळे घटस्फोट देण्याची तरतुद नाही, असा स्पष्ट निर्वाळा न्यायमूर्तींनी दिला आहे. (Infertility not ground for divorce)
कायदेविषयक वेबसाईट बार अँड बेंचने हे वृत्त दिले आहे. "मूल न होणं हे वैवाहिक जीवनाचा नैसर्गिक भाग आहे, अशा वेळी मूल दत्तक घेणे आणि इतर पर्यायांचा विचार होऊ शकतो. पण अशा स्थितीत घटस्फोटाची तरतुद हिंदू विवाह कायद्यात नाही," असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.
सोनू कुमार यांनी घटस्फोटासाठीची याचिका कौटुंबिक न्यायालयात दाखल केली होती, पण ही याचिका फेटाळली गेली. त्यानंतर कुमार यांनी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही पुनर्विचार याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
कुमार यांनी बायकोवर इतरही क्रुरतेचे आरोप केले होते, पण त्यांना त्यासंदर्भात पुरावे सादर करता आले नाहीत, असे कौटुंबिक न्यायालयाने म्हटले होते. बायको आजारी असताना एकदा डॉक्टरकडे सोनोग्राफी करण्यात आली होती, त्यातून ती गरोदर राहू शकत नाही, असे स्पष्ट झाले होते, असाही दावा कुमार यांनी केला होता.
कुमार यांचे वय २४ असून त्यांना वडील व्हायचे आहे, पण बायको सहजीवन नको असून तिला मूल होऊ शकत नाही, असे युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला. घटस्फोटासाठीची पार्श्वभूमी स्पष्ट होत नाही, तसेच बायकोच्या वर्तणुकीबद्दल जे आरोप केलेत त्यालाही काही सबळ पुरावा सादर केलेला नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निकालात उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा असे सबळ कारण दिसत नाही, या याचिकेत कोणतेही मेरिट नाही, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.
हेही वाचा