Latest

IND W vs ENG W: भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऐतिहासिक विजय, इंग्लडचा 347 धावांनी दारुण पराभव

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND W vs ENG W : भारतीय महिला संघाने इंग्लंडचा 347 धावांनी पराभव करून महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला. हा सामना जिंकण्यासाठी भारताने इंग्लंडला 479 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 131 धावांवर गारद झाला. भारतीय महिला संघाचा इंग्लंडविरुद्धचा हा एकूण तिसरा तर मायदेशातील पहिला विजय आहे. यापूर्वी टीम इंडियाने 2006 मध्ये टॉटन आणि 2014 मध्ये वर्म्सले येथे इंग्लंडला मात दिली होती.

नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या एकमेव कसोटीत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सामन्याच्या तीनही दिवस इंग्लिश संघावर वर्चस्व गाजवले. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 428 धावा ठोकल्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 136 धावांत आटोपला. अशाप्रकारे भारताने इंग्लंडवर 292 धावांची मोठी आघाडी घेतली.

भारताला इंग्लंडला फॉलोऑन देण्याची संधी होती, पण संघाने तसे केले नाही. कर्णधार हरमनने पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या दुसऱ्या डावात 6 बाद 186 धावा करून डाव घोषित केला. अशाप्रकारे पहिल्या डावातील आघीडच्या जोरावर हरमनप्रीत सेनेने इंग्लंडसमोर 479 धावांचे लक्ष्य ठेवले. तिसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेल्या इंग्लंडला हा सामना जिंकून इतिहास रचायचा होता, पण त्यांना तसे करता आले नाही. भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी शानदार कामगिरी केली. पहिल्याच सत्रात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला तंबूत पाठवले. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 27.3 षटकात केवळ 131 धावाच करू शकला.

इंग्लंडकडून कर्णधार हीदर नाइटने सर्वाधिक 21 धावा केल्या तर शार्लोट डीनने 20 धावांचे योगदान दिले. भारताकडून दुसऱ्या डावात दीप्ती शर्माने 4 आणि पूजा वस्त्राकरने 3 बळी घेतले. तर राजेश्वरी गायकवाडने दोन आणि रेणुका ठाकूरला एक विकेट घेण्यात यश आले.

दीप्ती शर्मा सामनावीर

अष्टपैलू दीप्ती शर्मा प्लेअर ऑफ द मॅच ठरली. भारताच्या पहिल्या डावात 113 चेंडूत 67 धावा फटकावत तिने इंग्लंडच्या पहिल्या डावात अवघ्या 7 धावा देऊन 5 फलंदाजांची शिकार केली. तर दुसऱ्या डावातही फलंदाजीत 20 धावांचे योगदान दिले आणि प्रतिस्पर्ध्या इंग्लंडच्या 4 विकेट्स मिळवल्या. अशाप्रकारे तिने एकूण सामन्यात 38 धावांत 9 गडी बाद केले.

दीप्तीची ऐतिहासिक कामगिरी

दीप्ती (39 धावांत 9 विकेट्स) ही एकाच कसोटीत सर्वाधिक 9 विकेट घेणारी चौथी भारतीय महिला गोलंदाज ठरली आहे. या यादीत तिचा आता झुलन गोस्वामीनंतर क्रमांक लागतो. झुलने 2006 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकूण 78 धावांत 10 बळी घेतले होते. या व्यतिरिक्त, हरमनप्रीत कौर (9/85) आणि नीतू (9/90) या कसोटीत 9 बळी घेणार्‍या भारतीय महिला क्रिकेटर आहेत. कसोटी डावात अर्धशतकासह 5 बळी घेणारी दीप्ती दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याआधी 1985 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शुभांगी कुलकर्णी हिने अशी कामगिरी केली होती.

9 वर्षांनंतर कसोटी विजय

भारतीय संघाने तब्बल 9 वर्षांनंतर कसोटी सामना जिंकला आहे. या कालावधीत संघ केवळ दोन सामने खेळला आणि दोन्ही सामने अनिर्णित राहिले. भारतीय महिला संघाची ही 40वी कसोटी होती. आतापर्यंत संघाला 6 विजय आणि 6 पराभव पत्करावे लागले आहेत. 27 सामने अनिर्णित राहिले.

भारताने श्रीलंकेचा विक्रम मोडला

महिलांच्या कसोटीत 300 हून अधिक धावांचा विजय मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. त्यांनी 1998 मध्ये पाकिस्तानचा 309 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता.

महिला कसोटीत धावांनी सर्वात मोठे विजय

347 धावा : भारत विरुद्ध इंग्लंड, 2023-24
309 धावा : श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, 1997-98
188 धावा : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 1971-72
186 धावा : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, 1948-49
185 धावा : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, 1948-49

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT