Latest

INDvsWI ODI : भारत-वेस्ट इंडिज वनडे सामने पहायला प्रेक्षकांना ‘नो एन्ट्री’

रणजित गायकवाड

अहमदाबाद; पुढारी ऑनलाईन : INDvsWI ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका (IND vs WI) 6 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू होत आहे. मात्र, प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी असून या मालिकेतील सामने पहायला मैदानात प्रेक्षकांना नो एन्ट्री असल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे प्रेक्षकांशिवाय वनडे मालिका खेळवली जाणार असल्याचे गुजरात क्रिकेट असोसिएशनने (GCA) सांगितले आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. अहमदाबाद शहरासह देशातील काही शहरांमध्ये सध्या कोरोनाची स्थिती ठीक नाही. त्यामुळे गुजरात क्रिकेट असोसिएशनने हा मोठा निर्णय घेतला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिली वनडे मॅच टीम इंडियासाठी खूप खास असणार आहे. भारतीय संघाचा हा १००० वा एकदिवसीय सामना आहे. या ऐतिहासिक आणि प्रेक्षकांविना होणा-या सामन्याबाबत गुजरात क्रिकेट असोसिएशनने सांगितले की, 'आम्ही भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर २०२२ मध्ये एकदिवसीय मालिका आयोजित करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. ६ फेब्रुवारी रोजी होणारा पहिला एकदिवसीय सामना खूप खास आणि ऐतिहासिक असेल कारण भारत त्यांचा १००० वा एकदिवसीय सामना खेळणार आहे. ही कामगिरी करणारा भारतीय संघ जगातील पहिला क्रिकेट संघ ठरणार आहे. (INDvsWI ODI)

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन वनडे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. पहिला सामना ६ फेब्रुवारीला, दुसरा एकदिवसीय सामना ९ फेब्रुवारीला आणि अंतिम आणि तिसरा सामना ११ फेब्रुवारीला होणार आहे. यानंतर कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर दोन्ही संघांमधील टी-२० मालिका होणार आहे. टी-२० मालिकेतील सर्व सामने कोलकात्याच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवले जाणार आहेत. मात्र, बंगाल सरकारने ७५ टक्के प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी दिली आहे. (INDvsWI ODI)

SCROLL FOR NEXT