Latest

INDvsAUS 4th Test : उस्मान ख्वाजाचे शतक, ऑस्ट्रेलियाचे पारडे जड

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात खेळपट्टीचा मूड बदलताच चेंडूचा प्रभाव ओसरला आणि बॅटने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 90 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 255 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर उस्मान ख्वाजाने (104*) शतक झळकावले, तर कॅमेरून ग्रीन 49 धावांवर नाबाद तंबूत परतला.

ऑस्ट्रेलियाचे चांगली सुरुवात

ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या उस्मान ख्वाजा आणि ट्रॅविस हेड या सलामी जोडीने हा निर्णय योग्य ठरवला आणि अर्धशतकी भागिदारी रचून संघाला चांगली सुरवात करून दिली. दोघांनी 13 षटकात 50 धावांचा टप्पा ओलांडला.

भारतीय गोलंदाजांच्या लाईन-लेन्थमध्ये त्रुटी

दुसरीकडे, अहमदाबादच्या हिरव्यागार खेळपट्टीवर भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि मोहम्मद शमी दोघांनाही चांगला स्विंग मिळत होता पण लाईन आणि लेन्थमधील त्रुटीमुळे त्यांना सुरुवातीला विकेट मिळाली नाही. त्यातच हेडला सहाव्या षटकात जीवदान मिळाले. विकेटकीपर केएस भरतने उमेश यादवच्या चेंडूवर त्याचा सोप्पा झेल सोडला.

कांगारूंना सलग दोन झटके

15.1 व्या षटकात अश्विनने हेडला माघारी धाडून भारताला पहिले यश मिळवून दिले. सलामीवीर ख्वाजा आणि हेडमध्ये 61 धावांची भागीदारी झाली. डावखु-या हेडने 44 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीने 32 धावा केल्या. त्यानंतर 22.2 व्या षटकात शमीने मार्नस लॅबुशेनला बाद केरून कांगारूंना दुसरा झटका दिला. चेंडू बॅटची कड घेऊन स्टंपला लागला. यावेळी पाहुण्या संघाची धावसंख्या 72 होती.

ख्वाजा-स्मिथने डाव सांभाळला

पहिल्या सत्रात 2 गडी गमावणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाच्या ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ जोडीने दुसऱ्या सत्रात टीच्चून फलंदाजी केली. सध्याच्या मालिकेतील हे पहिले सत्र होते ज्यात एकही विकेट पडली नाही. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. दरम्यान, स्मिथला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आले नाही आणि तो 135 चेंडू खेळून 38 धावांवर बाद झाला. 64 व्या षटकात 151 धावसंख्येवर जडेजाने कांगारूंच्या कर्णधाराला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि क्लिन बोल्ड केले. पीटर हँड्सकॉम्बच्या रुपात ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. शमीने त्याचा त्रिफळा उय्डवला. हँड्सकॉम्ब 27 चेंडूत 17 धावा केल्या. यावेळी कांगारूंची धावसंख्या 70.4 षटकात 170 होती.

टॉप-मिडल क्रमवारीत तीन भक्कम भागीदारी

टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी एकमेकांच्या साथीने संयमी फलंदाजी करून महत्त्वपूर्ण धावांचे योगदान दिले. ख्वाजाशिवाय त्यांच्या इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही, मात्र त्याने तीन ट्रॅव्हिस हेड सोबत 61, स्टीव्ह स्मिथ सोबत 79 आणि कॅमेरून ग्रीन सोबत नाबाद 85 धावांच्या तीन भागीदारी केल्या.

ख्वाजाचे शतक

डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या उस्मान ख्वाजाने संयमी फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने एक टोक धरले आणि भारतीय गोलंदाजांना आपली विकेट घेण्यासाठी घाम फोडला. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी त्याने आपले शतक पूर्ण केले. त्याने 246 चेंडूत आपले 14 वे कसोटी शतक पूर्ण केले. भारताविरुद्धच्या कसोटीतील हे त्याचे पहिले शतक आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो 104 धावांवर नाबाद परतला. त्याने 251 चेंडूंच्या खेळीत 15 चौकार मारले आहेत.

अशी झाली भारताची गोलंदाजी

भारताकडून शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने लबुशेन आणि हँड्सकॉम्बच्या रूपाने 2 बळी घेतले. उमेश यादवने 15 षटके टाकली, ज्यात त्याने 58 धावा दिल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. अक्षर पटेलने केवळ 14 धावा देत 12 षटके टाकली. इकॉनॉमी रेट चांगला असूनही तो विकेट मिळवण्यात अपयशी ठरला. रवींद्र जडेजाने 20 षटकात 49 धावा देत 1 बळी घेतला. तर अश्विनच्या खात्यात हेडची विकेट जमा झाली.

भारतीय संघात बदल…

ऑस्ट्रेलियन संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, तर रोहित शर्मा एका बदलासह मैदानात उतरला. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT